बाईपण भारी देवा : आनंददायी मुलाखत

बाईपण भारी देवा

     केवळ महाराष्ट्रात नव्हे  तर केरळ , तेलंगणा अशा अमराठी राज्यांतही आणि अगदी सातासमुद्रापार अमेरिकेतसुद्धा रसिकांच्या तुफान गर्दीचे नवनवे उच्चांक नोंदविणारा आणि आपल्या सफलतेचा आलेख प्रत्येक दिवसागणिक उंचावणा-या, केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाची भारी टीम चतुरंगच्या मुक्तसंध्या उपक्रमातंर्गत मुलाखतीद्वारा रसिकांशी या चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी रविवार , दिनांक १३ ऑगस्ट , २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात डोंबिवली पूर्वेतील सुयोग मंगल कार्यालयात जमली होती. दिग्दर्शक श्री.केदार शिंदे यांच्यासह जियो सिनेमाचे श्री.निखिल साने आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते , सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांना बोलतं करुन त्यांच्याशी गप्पांद्वारा या चित्रपटाचा प्रवास उलगडून दाखविण्यासाठी मुलाखतकाराच्या भूमिकेत होत्या  अत्यंत अभ्यासू आणि मर्मज्ञ अशा सुप्रसिद्ध निवेदिका , सूत्रसंचालक  डॉक्टर समीरा गुजर-जोशी. 
        रसिकांच्या ओसंडून वाहणा-या गर्दीतील सभागृहात सर्व कलाकारांचे आगमन होताच बाईपण भारी देवा या चित्रपटाचे शीर्षकगीत लावून कलाकारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सर्व रसिकांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून टाळ्यांच्या गजरात सर्व कलाकारांचे स्वागत केले. कलाकारांनीही तितकीच मनमोकळी दाद देऊन रसिकांशी हस्तांदोलनही केले. ठीक ६ वाजता कार्यक्रमाला सुरवात झाली. एका रसिकाने अगदी उत्स्फूर्तपणे  दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असणा-या चतुरंगचे कार्यक्रमही अगदी ठरलेल्या वेळेत सुरु होतात हा आमचा नेहमीचा अनुभव असल्याचे सांगताच रसिकांनी टाळ्या वाजवून त्यास अनुमोदनही दिले.
   चतुरंग कार्यकर्त्या सौ.नेहा उतेकर यांनी प्रारंभिक प्रास्ताविकात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे आयडियल रोड बिल्डर्सच्या सर्वेसर्वा श्रीमती सुधाताई म्हैसकर यांच्या हस्ते पुष्पस्वागत करुन भरगोस प्रतिसादाबद्दल रसिकांनाही धन्यवाद दिले. 
        मुलाखतीला सुरवात होण्यापूर्वी श्री.केदार शिंदे यांनी  यापूर्वीही चतुरंगमध्ये अनेकवेळा कार्यक्रमानिमित्त येणे झालेले आहे आणि नेहमीच या संस्थेने आम्हांला  प्रोत्साहन दिलेले आहे. यावेळीही आम्हांला लाभलेल्या यशाबद्दल आमचे कौतुक करण्यासाठी आयोजिलेल्या या कार्यक्रमाबद्दल चतुरंग संस्थेप्रती आपल्या ऋणभावना व्यक्त केल्या
        डॉ.समीरा  ताईंनी  आपल्या कौशल्यपूर्ण हाताळणीने खूप  छानपणे वातावरण निर्मिती करुन आपल्या नेमक्या प्रश्नांद्वारा सर्वांना मनमोकळं बोलतंही केलं. गप्पांद्वारा चित्रपटाचा पडदा अलगद हळूहळू उलगडत गेला. चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे धमाल किस्से सांगून तर कधी उपस्थित रसिकांनाही आपल्यात सामिल करुन घेऊन अत्यंत अनौपचारिक अशी गप्पांची मैफल सादर होत होती आणि सभागृहातला प्रत्येक रसिक त्या मैफिलीचा मनमुराद आनंद घेत होता. " प्रत्येकजण या चित्रपटाच्या कथानकाचे , चित्रीकरणाचे , आमच्या अभिनयाचे मनापासून कौतुक तर करतोच आहे पण त्याहीपेक्षा या चित्रपटामुळे आमच्या घरांतही आमचा सन्मान वाढला आहे याचा आम्हांला अधिक अभिमान , अप्रुप वाटतं " असं अत्यंत प्रामाणिकपणे तिघीही अभिनेत्रींनी सांगितले. 
       चित्रपटाच्या यशाविषयी बोलताना केदार शिंदे आणि निखिल साने दोघांच्याही बोलण्यात एकवाक्यता दिसून आली. ' चित्रपट प्रेक्षकांना आवडेल आणि आर्थिक बाबीवरही ब-यापैकी यशस्वी होईल असं सुरवातीला वाटलं होतं पण इतकं प्रचंड यश मिळेल असं मात्र स्वप्नातही नव्हतं वाटलं. पाच कोटी बजेटच्या या सिनेमाने आजपर्यंत ७५ कोटींचा व्यवसाय केलाय आणि आजपर्यंत या बाबतीत सफलतेचा उच्चांक नावावर असणा-या ' सैराट ' या चित्रपटाच्या आम्ही अगदी जवळ आहोत हे केदारनी अत्यंत अभिमानाने सांगितले. केदार शिंदेंच्या या बोलण्यावर उत्स्फूर्तपणे उभे राहून " शंभर कोटीच काय हा चित्रपट एक हजार कोटींचा व्यवसाय करेल असा आम्हां रसिकांना विश्वास वाटतो " असं एकाने सांगितले तर आणखी एका प्रेक्षकाने या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळावे अशी इच्छा प्रदर्शित केली. रसिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिक्रियांमुळे व्यासपीठावरील कलाकारांच्या चेहे-यावरील समाधानी स्मित स्पष्टपणे दिसत होते.
       प्रत्येक कलाकाराने या चित्रपटाच्या संदर्भात आपल्याला मिळालेल्या रसिकांच्या प्रतिक्रियाही मनमोकळेपणाने सांगीतल्या. हाच धागा पकडून सुचित्रा बांदेकर यांनी चतुरंगचे विद्याधर निमकर यांच्या संदर्भातली आपली आठवण आवर्जून सांगून त्यांच्याप्रती आपल्या कृतज्ञ भावना व्यक्त केल्या. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या विद्याधर निमकर हे माझे नाट्यक्षेत्रातले पहिले गुरु. स्व.श्री. बाळ कोल्हटकरांचे ' लहानपण देगा देवा ' हे माझे पहिले व्यावसायिक नाटक. त्यावेळी मी शाळकरी पोर होते. पण त्यावेळी त्या नाटकाची संपूर्ण रिहल्सल विद्याधर निमकरांनी खूप मेहेनतीने माझ्याकडून करुन घेतली , बाळ कोल्हटकरांनी लिहिलेले संवाद माझ्याकडून अक्षरशः घोटून घेतले आणि माझ्या नाट्यक्षेत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात झाली हे मी कधीच विसरणार नाही.
   
       कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्यावर रसिकांनाही प्रश्न विचारुन आपली उत्सुकता शमविण्याची संधी दिली गेली. ब-याचजणांनी संधीचा फायदा घेऊन कलाकारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. कलाकारांनीही तितक्याच मोकळेपणाने रसिकांना प्रतिसाद दिला.
      चतुरंग कार्यकर्ती नीलिमा भागवत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लाभलेल्या सर्व सहकारी हातांबद्दल चतुरंग मनातली कृतज्ञता व्यक्त केली आणि एका छान कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 13 ऑगस्ट 2023  06:00 PM
ठिकाण
सुयोग मंगल कार्यालय ,डोंबिवली
पत्ता