शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग – २०१७

शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग
चिपळूण:सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात चतुरंग प्रतिष्ठान गेली ४० वर्षे “चतुरस्त्र” कामगिरी करत आहे. नाविन्य जोपासणे हे या संस्थेचे महत्वाचे वैशिष्ट्य. “शिक्षक प्रेरणा जागृती वर्गा”च्या निमित्ताने पुन्हा एकदा नावीन्य जोपासले आहे. गेली २२ वर्षे निवासी अभ्यासवर्गाच्या मार्फत चतुरंग प्रतिष्ठान सक्षम विद्यार्थी तयार करत आहे. त्याचबरोबर सक्षम शिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्यावर्षी चतुरंग प्रतिष्ठान व ज्ञानप्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग” सुरू करण्यात आला. हा वर्ग ४ टप्प्यात पार पडला. या वर्गाचा समारोप व प्रशस्तीपत्रक वितरण सोहळा ३१ डिसेंबर २०१७ रोजी ब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली ख्यातनाम मुर्तिशास्त्राचे चे अभ्यासक व चतुरंग प्रतिष्ठान चा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डॉ. गो. बं. देगलूरकर यांची. याच बरोबर पुण्यातील जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे व पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी निगडी चे प्रमुख श्री. आदित्य शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात झाली ती डॉ. सागर देशपांडे यांच्या व्याख्यानाने. शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक असलेल्या डॉ. देशपांडे सरांनी उपस्थित शिक्षकांना व इतर श्रोत्यांना मार्गदर्शन केले. “देशातील सर्व समस्यांवरची औषधाची गोळी म्हणजे शिक्षण” असं डॉ. देशपांडे यांचे मत आहे. डॉ. देशपांडे यांनी औपचारिक व्याख्यानास बाजूला सारून प्रश्न उत्तरांच्या साहाय्याने शिक्षकांशी संवाद साधला. भाषेचे संगोपन फार महत्त्वाचे आहे. “संस्कृत ही सर्वांची आजी आहे, मराठी ही सर्वांची आई आहे तर इंग्रजी ही शेजारच्या घरातील मैत्रीण आहे” अशा गमतीशीर पद्धतीने सरांनी विविध भाषांचे महत्व पटवून दिले. शिक्षणातील कमी अधिक घटकांवर त्यांनी शिक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर डॉ. देशपांडे यांनी शिक्षक व श्रोते यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली.
यानंतर समारोपाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. चतुरंगचे संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी या शिक्षक प्रेरणा जागृती वर्गाच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. स्व. एस वाय गोडबोले सरांच्या प्रेरणेतून या संकल्पनेची खरी ठिणगी पडली. ज्ञानप्रबोधिनी चा कार्यकर्ता आदित्य शिंदे याने या वर्गातील ज्ञानप्रबोधिनीची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर या वर्गासंबंधित पुस्तिकेच्या अनावरण सोहळा पार पडला. डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते काही निवडक शिक्षकांना प्रशस्तीपत्रकाचे वितरण व्यासपीठावर करण्यात आले. त्यानंतर या वर्गातील शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वर्गमुळे चौफेर ज्ञानाची कवाडे खुली करण्यात आली. पराग कदम यांच्या मते ज्याप्रमाणे आपण वहीत मोरपंख जपून ठेवतो त्याच प्रमाणे या वर्गाच्या आठवणी मनात जपून ठेवल्या जातील. प्रकाश वावरे यांच्या मते या वर्गामुळे विचारांना चालना मिळाली.
या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. शिक्षकाकडे ज्ञानाच्या पातळीची मर्यादा कुठवर असावी याचे मार्गदर्शन देगलूरकर सरांनी केले. त्यांच्या जीवनातील शिक्षकांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. त्या शिक्षकांमुळे आपल्याला इथं पर्यंत पोहचण्याची प्रेरणा मिळाली असे त्यांचे म्हणणे होते. चांगले शिक्षक लाभणे ही नवीन पिढीसाठी भाग्याची गोष्ट आहे असे त्यांनी म्हटले. चतुरंग कार्यकर्त्या सौ. इंद्रायणी दीक्षित यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे ऋण निर्देशक केले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?December 31, 2017
10.00 AM
ठिकाणब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण
पत्ताब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण
प्रमुख पाहुणेचतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी, डॉ. गो. बं. देगलूरकर, संपादक डॉ. सागर देशपांडे, प्रमुख श्री. आदित्य शिंदे

फोटो गॅलरी