थक्क करणारा सवाई एकांकिकोत्सव २०१८ – वर्ष- दुसरे..!!

मास्तर अर्थात स्व. गणेश सोलंकींच्या पश्चात ‘सवाई एकांकिका स्पर्धे’चं आयोजन सुरु झालं. महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरात झालेल्या विविध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धामधुन केवळ प्रथम पारितोषिक विजेत्या अर्थात ‘ Best Of the Year आणि Best Of the State’ अशा सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाते. ह्या स्पर्धेची अंतिम फेरी २५ जाने.ला रात्री सुरु होऊन २६ जाने.ला पहाटे एकत्रित वंदे मातरम ने सम्पन्न6 होते. दरवर्षी मुंबईत होणाऱ्या सवाईचा आनंद पुणेकर चोखंदळ रसिकांनाही घेता यावा,म्हणून मागील वर्षीपासून ह्या स्पर्धेतील तीन अथवा चार एकांकिकांचा ‘सवाई एकांकिकोत्सव’ भरत नाट्य मंदिरात संपन्न होतो..एकांकिकोत्सवाचं हे दुसरं वर्ष..’सेकंड हॅंड’, ‘निर्वासित’, ‘म्याडम’ आणि ‘संगीत-घागरे के पिछे’ह्या चार एकांकिकांचं ह्यादरम्यान सादरीकरण करण्यात आलं. ह्या वर्षीचा एकांकिकोत्सव खऱ्या अर्थान आगळा-वेगळा ठरला कारण ह्या एकांकिकांमधुन मांडले गेलेले विषय.. असं म्हणतात की ‘नाटक हे समाजाचा आरसा असलं पाहिजे'; समाजातील अगदी तळागाळातील माणसाचे प्रश्न, त्याच्या समस्या, प्रथा-परंपरा इत्यादीना वाचा फोडण्याचं हे माध्यम असलं पाहिजे.
लोकांच्या घरात मोलमजुरी करून घर चालवणारी आई. मुलीला इंग्रजीची वाटणारी भीती आणि त्यातून परीक्षेत वारंवार येणारं अपयश.. इंग्रजीबद्दलचा आपल्या मुलीच्या मनातील ‘न्युनगंड’ दूर करण्यासाठी ती स्वतः इंग्रजी शिकायला सुरुवात करते आणि मुलीलादेखील इंग्रजीची गोडी लावते. एकंदरीत E=F अर्थात Education = Future हा महत्वाचा संदेश ‘म्याडम’ही गो. जो. महाविद्यालय, रत्नागिरीची एकांकिका आपल्यापर्यंत पोहचवते.
सिडनहँम महाविद्यालय, मुंबई प्रस्तुत ‘निर्वासित’ह्या एकांकिकेमधुन दलित समाजातील बाप आणि मुलगा ह्यांच्या विचारातील द्वंद्वात्मक संघर्ष अतिशय सशक्त अभिनयातून मांडला गेला. आयुष्यभर BMC त नोकरी केलेला आणि रिटायरमेंटला एक वर्ष उरलेला बाप.त्याला मुंबईतली ती गर्दी, तोच तो लोकलचा आवाज ह्याचा आता तिटकारा आलेला आहे; तर त्याच मुंबईत शिक्षण घेतलेल्या त्याच्या मुलाला ही ‘मायानगरी’ खुणावतेय मात्र त्याचवेळी गावाकड़ची ती शांतता ‘खायला’उठते. मग ह्यातून दररोज उडणारे खटके, कुटुंबातील भांडणं ह्याचं हृदयद्रावक सादरीकरण ह्यामधुन करण्यात आलं.
सेक्स, नवरा-बायको मधील नातेसंबंध इत्यादींवर निर्भिड भाष्य करणारी आणि जात-पंचायतीसमोर लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या बायकोची ‘पवित्रता'(?) सिद्ध करण्यासाठी ‘Verginity’ दाखवण्याच्या एका अमानुष प्रथेविरुद्ध बंड करणारी ‘संगीत-घागरे के पिछे ‘ ही रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई प्रस्तुत एकांकिका सादर करण्यात आली. Verginity खरंच matter करते का ? ‘सेक्स ही केवळ गरज अथवा भावना नसून पती-पत्नीच्या नात्यातील ‘Balance’ टिकवणारी एक ‘भावनिक गरज’ आहे, ह्यावर परखड़ आणि बेधड़क भाष्य करणारी ही एकांकिका मन हेलावून टाकणारी होती.
तीन वर्षापुर्वी dating site वरुन ओळख करून सेक्स केलेल्या मुलांसमोर जेव्हा ती मुलगी प्रत्यक्ष लग्नासाठी समोर येते तेव्हा काय होतं, हे दाखवणारी ‘सेकण्ड हैंड’ ही एकांकिका सादर करण्यात आली.
एकंदरीतच, समाजातील काहीसे न बोलले जाणारे (निव्वळ लाजेस्तव) परंतु तितकेच महत्वाचे विषय अतिशय परखड़पणे ह्या एकांकिकोत्सवात मांडले गेले, ज्यामुळे हा नाट्य-उत्सव पुणेकरांना थक्क करणारा ठरला..

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?February 3, 2018
5.00 PM
ठिकाणभरत नाट्य संशोधन मंदिर , पुणे
पत्ताभरत नाट्य संशोधन मंदिर , पुणे

फोटो गॅलरी