सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार – २०१८

शिक्षणकार्यासाठी स्वतः स झोकून देऊन केवळ आदर्श विद्यार्थी घडावा यासाठी झटणारे स्व. एस. वाय. गोडबोले सर यांच्या प्रेरणेतून उदयास आलेली संकल्पना म्हणजे “चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार”. गेली 17 वर्षे या पुरस्काराने कोकणच्या विविध शाळांतून हिरे शोधून देण्याचे काम केले आहे. चतुरंग प्रस्तुत “सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराचे” हे १८ वे वर्ष. चिपळुणातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या “गुरुदक्षिणा” सभागृहात दि. 7 जाने. 2018 रोजी ठीक 9.30 ला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली ती नृत्यगुरू सौ. सोनिया परचुरे यांची. याच बरोबर युनायटेड इंग्लिश स्कूल चे माजी अध्यापक श्री मुकुंद कानडे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी भूमीतील विविध शाळांतून मुलाखती स्वरूपाने निवड केलेल्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला गेला. कोकणातील 48 शाळांमधील 193 मुलांनी यात सहभाग घेतला होता. यात विविध शाळांमधून 31 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. रत्नांच्या विविध पैलूंच मुलाखतीद्वारे परीक्षण करण्याचं शिवधनुष्य पेलले ते एका चतुरंग बाह्य निवड समितीने. या निवड समितीत मुंबईतील शिक्षणतज्ञ शैलजा मुळ्ये, शिवाजीराव सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळीचे उत्साही मुख्याध्यापक श्री राजेंद्रकुमार वारे व रत्नागिरीतील ज्येष्ठ शिक्षक श्री. श्रीकांत काळे सर सहभागी होते.
सर्व प्रथम या पुरस्काराचे स्वरूप, त्यातील उद्दिष्टे या संबंधी चतुरंगचे संस्थापक सदस्य मा. विद्याधर निमकर यांनी प्रास्ताविक केले. स्व. एस वाय गोडबोले यांच्या नावाचा समावेश असलेल्या या पुरस्काराची सुरुवात सन 2000 साली गोडबोले सरांच्या हयातीतच झाली. प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रू. 1500 हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांमधील अष्टपैलू जाणून त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना सुजाण नागरिक घडण्यासाठी प्रेरणा देणे हे या संकल्पनेचे प्रमुख उद्दीष्ट आहे असे मा. विद्याधर निमकर यांनी नमूद केले. त्यानंतर निवडसमितीचे सदस्य असलेले काळे सर यांनी त्यांच्या मुलाखती संबंधी अनुभवाचे कथन केले. शिवाय मुलांतील काही त्रुटी संबंधी त्यांनी परखडपणे आपले मत मांडले. या नंतर प्रमुख वक्ते श्री कानडे सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. युनायटेड इंग्लिश स्कूल चे माजी शिक्षक असलेले कानडे सर यांनी त्यांचे शैक्षणिक विचार मांडले. त्यांच्या मते “सज्जनशील व्यक्ती म्हणून जन्माला येणे हे भोगांचे फलित आहे परंतु सज्जनशील व्यक्ती म्हणून मरण पावणे हे आपल्या हातात असते. माणूस कसा असावा? सरांच्या मते आरोग्यसंपन्न, जीवनकौशल्य , पूरककौशल्य, प्रेरककौशल्य इत्यादी घटकांनी तो पूरक असावा. सध्या नितिमुल्यांची होत असलेली पखरण, शिक्षणाची घसरण या संबंधी त्यांनी मत मांडले. गोडबोले सरांबद्दलच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अहंकारहीन माणसाला जीवनात कधीच दुःख सोसावे लागत नाही असे त्यांचे म्हणणे होते. गोडबोले सरांचा आदर्श घेऊन या पिढीने वाटचाल करावी असे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले. यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. सौ सोनिया परचुरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. वितरण सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध गुण वैशिष्ट्यांचे कथन करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजेश्वरी पाटील हिने वाचनाचे महत्व पटवून दिले. “कोशिश करने वालोंकी कभी हार नहीं होती” अस म्हणून कायम प्रयत्नशील राहण्याचे वचन दिले. ऋषिकेश भटडगावकर याने त्याच्या सिंधुदुर्गात चतुरंगी चळवळ सुरू करण्याचे वचन दिले. चिन्मय पांचाळ या विद्यार्थ्यांचे आई वडील अंध अपंग असून त्यांनी त्यास ज्या पद्धतीने वाढवले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर प्रमुख अतिथिंनी मार्गदर्शन केले. सोनियाजी यांच्या मते जीवनात स्थिरता फार महत्त्वाची आहे. मनातील भाव चेहऱ्यावर आणणे फार महत्वाचे आहे . सोनिया परचुरे या सुप्रसिद्ध नृत्यांगना, अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत. जीवनातील निरीक्षण कौशल्याचे महत्व त्यांनी त्यांच्या जीवनातील उजाळ्यांनी पटवून दिले. थोडक्यात “जीवन हे सादर करण्यासाठी नसून साजरे करण्यासाठी आहे” असा कानमंत्र त्यांनी दिला. यानंतर ज्येष्ठ चतुरंग कार्यकर्ते अनंत पवार यांनी ऋण निर्देशक केले. चतुरंगचे कार्य हे “एखाद्या फुलांच्या परडी प्रमाणे आहे” हे कार्य अखंडित चालू राहील याची ग्वाही त्यांनी दिली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. …….

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?January 7, 2018
9.30 AM
ठिकाण"गुरुदक्षिणा" सभागृह , युनायटेड इंग्लिश स्कूल ,चिपळुण
पत्ता"गुरुदक्षिणा" सभागृह , युनायटेड इंग्लिश स्कूल ,चिपळुण
प्रमुख पाहुणेनृत्यगुरू सौ. सोनिया परचुरे

फोटो गॅलरी