रत्नागिरी : स्वरदीपोत्सव!

महाराष्ट्राची दिवाळी ही इतरांपेक्षा साहित्यिकदृष्ट्या वेगळी असते. कारण येथे साजरी होणारी दिवाळी पहाट! आणि महाराष्ट्रातील दिवाळी पहाट ही संकल्पना सुरुवातीचा रुजवली चतुरंग प्रतिष्ठानने! १९८६ साली दादरला शिवाजी मंदिर येथे ही दिवाळी पहाट सुरू झाली. हे या कार्यक्रमाचे चौतीसावे वर्ष आहे. सुधीर गाडगीळ यांच्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात साडेतीनशे ते चारशे दिवाळी पहाट कार्यक्रम साजरे होतात मात्र चतुरंगचे स्वरूप यापेक्षा वेगळे असते कौटुंबिक वातावरणामध्ये ही दिवाळी पहाट साजरी होते, हे या मैफिलीचे वेगळेपण होय.
यावर्षी ही दिवाळी पहाट रत्नागिरी येथे दिनांक 29 ऑक्टोबर 2019 रोजी जयेश मंगल पार्क, रत्नागिरी येथे पार पडली. यावर्षी लोकप्रिय गायिका सौ. मंजुषा पाटील यांनी पहाट मैफल केली. यांना राया कोरगावकर यांनी हार्मोनियम, मयंक बेडेकर यांनी तबला, प्रथमेश तारळकर यांनी पखवाज, हरेश केळकर यांनी टाळ अशी साथ संगत केली. या कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर यांनी केले तर ध्वनी संयोजन उदयराज सावंत यांनी केले.

मंजूषा पाटील या आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका आहेत यांचे प्राथमिक गायनाचे शिक्षण द. वि. काणेबुवा यांच्याकडे झाले. सध्या त्या पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडे शिकत आहेत. त्यांनी कर्नाटक येथे गुरुकुलाची स्थापना करून त्या गुरुकुल पद्धतीने संगीत शिकवतात. यांना पंडित जसराज गौरव पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार,गुरुवर्य बी. एस. उपाध्ये स्मृती पुरस्कार – २०१० संगीत शिरोमणी पुरस्कार २००८ ,संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार २०१२कुमार गंधर्व पुरस्कार २०१६-१७ हे पुरस्कार मिळाले आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेत्रा केळकर हिने केले. कार्यक्रमाची सुरुवात बिभास रागातील ‘मित पिहरवा रे’आणि ‘कैसे उमरवा जाय हमरवा’ या बंदिशीनी केली. यानंतरच्या उपशास्त्रीय गायन प्रकारात त्यांनी मिश्रखमाज रागातील ‘कोन गली गयो शाम’ ही ठुमरी सादर केली. पुढे संत मीराबाई यांचा ‘म्हारे घरा आओजी प्रीतम प्यारा’ हा अभंग सादर केला. यानंतर संत ज्ञानेश्वरांचा ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ हा अभंग सादर केला. निवेदक निबंध कानिटकर यांनी या अभंग विषयीची पंडित भीमसेन जोशींची एक हृद्य आठवण सांगितली.
यानंतर सुप्रसिद्ध गीतकार मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आणि महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे यांनी संगीत दिलेले ‘माझे जीवनगाणे’ हे गीत सादर करण्यात आले. यानंतर “देव दिसे ठायी ठायी, भक्त लीन भक्ता पायी” यातून साधा सरळ भक्तिमार्ग समजवणारे संत गोरा कुंभार या नाटकासाठी कवी अशोक परांजपे यांनी लिहिलेले ‘अवघे गरजे पंढरपुर’ हे भक्ती गीत सादर करण्यात आले. संत चोखामेळा यांची रचना असलेला आणि पं. अभिषेकी बुवांची खासियत असलेला ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ अभंग आणि त्याला जोडूनच संत जनाबाईंचा ‘संतभार पंढरीत’ हा अभंग सादर करण्यात आला.
चतुरंग प्रतिष्ठान कायमच समाजभान जपत आली आहे आणि आपल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमातून आपण दरवर्षी एका समाजसेवी संस्थेत भाऊबीज भेट म्हणून मदत केली जाते. यावर्षी लाईफ लाईन फाऊंडेशन रत्नागिरीला ही भाऊबीज भेट केली गेली. डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन वर्ष ही संस्था रत्नागिरीकरांसाठी जणू ‘लाईफलाईन’च बनली आहे. अशा या समाजप्रिय संस्थेला चतुरंगची यावर्षीची भाऊबीज भेट दिली. याची माहिती सुशांत केतकर याने दिली आणि ऋणभावना व्यक्त केले. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते डॉ. ऋषिकेश केळकर यांना भाऊबीज भेट दिली गेली
यानंतर मंजूषा पाटील यांचा वैशिष्ट्यपूर्ण असा हातखंडा असलेली अभंगरचना म्हणजे ‘जोहार मायबाप’ या अभंगातून त्यांनी रसिकांची मनं जिंकली. अभंगाच्या अखेरीस झालेल्या शंखनाद यामुळे कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला. मैफिलीचे निवेदक निबंध कानिटकर आणि गायिका मंजुषा पाटील यांनी चतुरंगच्या युवा कार्यकर्त्यांचं आणि आयोजनाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांना सर्व रसिकप्रेक्षकांना फराळ देऊन निरोप घेण्यात आला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?October 29, 2019
6.00 AM
ठिकाणजयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस, रत्नागिरी.
पत्ताजयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस, रत्नागिरी.
प्रमुख पाहुणेमंजुषा कुलकर्णी, राया कोरगावकर(हार्मोनियम), मयंक बेडेकर(तबला),प्रथमेश तारळकर(पखवाज), आणि हरेश केळकर(टाळ), पूर्वा पेठे

फोटो गॅलरी