चतुरंग रत्नागिरी प्रथम वर्धापनदिन

साधारण वर्षभरापूर्वी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात चतुरंगच्या निवासी वर्गातील रत्नागिरीत शिक्षणासाठी असलेले विद्यार्थी एकत्र आले. त्यांच्या वर्गातील दादा ,ताई ,काका, काकूंची भेट घेतली आणि गप्पांच्या ओघात एक नवी कल्पना उदयास आली. “चतुरंग ची एखादी शाखा रत्नागिरीत सुरू झाली तर?” कल्पना उत्तमच होती. आपल्या लाडक्या संस्थेची शाखा रत्नागिरीत सुरू होणार म्हटल्यावर सर्वांचे चेहरे पल्लवीत झाले. पण संस्था चालवणार कोण? “आम्ही करू ना!” असं म्हणून रत्नागिरीकर तरुण कार्यकर्त्यांनी विडा उचलला आणि रत्नागिरीत चतुरंगशाखेची मुहूर्तमेढ रोवली गेली..
आज 18 फेब्रुवारी 2018 रोजी चतुरंग रत्नागिरी शाखेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली. वर्धापन दिनाच्या निमित्ताने रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात सर्व कार्यकर्ते एकत्र जमले आणि लक्ष्मी-नारायणासमोर चतुरंगच्या पुढील वाटचाली साठी प्रार्थना करण्यात आली. डॉ. सुभाष देव यांच्या हस्ते मूर्तीची पूजा करण्यात आली. या नंतर सर्व कार्यकर्ते पतित पावन मंदिराच्या सभागृहात एकत्र जमले. या वर्षीच चतुरंग च रंगसंमेलन पुणे येथे पार पडलं. त्या रंगसंमेलना संबंधी एक चित्रफीत दाखविण्यात आली. चतुरंग रत्नागिरीचा कार्यकर्ता यश कापडी याने सर्व कार्यकर्त्यांना चतुरंगच्या रत्नागिरीतील प्रवासाबद्दल माहिती दिली. त्या नंतर प्रत्येक कार्यकर्त्याने आपली ओळख करून दिली. त्यातील बहुतेकजण चतुरंगच्या निवासी वर्गाचे विद्यार्थी होते पण त्या व्यतिरिक्त अनेक जण या कार्यात सहभागी झाले होते. काहीजणांना येथे येऊन वर्ष झाले होते तर काहीजण काही दिवसांपूर्वीच कार्यकर्ता म्हणून सहभागी होऊ लागले होते. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्ती केली. मागच्या वर्षभरात आपण मी काय शिकलो/शिकले ? यासंबंधी काहींनी आपली मते मांडली. रोहित जोशी याने निवासी वर्गातील काही आठवणींना उजाळा दिला. रेवती गद्रे हिने मागच्या वर्षभरात तंत्रज्ञानाच्या आधारे ज्या संकल्पना मांडल्या गेल्या त्या संबंधी माहिती दिली. योगिता पाध्ये हिने वर्षभरात आपल्या पदरी जे पडले त्याची निरपेक्ष कबुली दिली. तेजा नवले व श्रद्धागौरी मराठे हिने वर्षभरात रत्नागिरी केंद्रात तसेच इतर ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांबद्दलचे अनुभव सांगितले. चतुरंगमुळे आमच्या हातून निरपेक्ष समाजकार्य घडले असे चतुरंग कार्यकर्ती श्रुती करकरे हीचे मत होते.
या नंतर प्रमुख अतिथी डॉ. सुभाष देव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी चतुरंगच्या आणि त्यांच्या संबंधांना उजाळा दिला. एस. वाय. गोडबोले सरांबद्दलचे काही अनुभव सांगितले. चतुरंग म्हणजे व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी व्यासपीठ आहे असे त्यांचे मत होते. कार्यकर्त्याने मधमाशीच्या आदर्श घ्यावा. ज्या प्रमाणे मधमाशी तीस नेमून दिलेले काम निरपेक्षपणाने करते त्याप्रमाणे कार्यकर्त्याने आपली जबाबदारी पार पाडावी या बद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर जमलेल्या कार्यकर्त्यांनी आपले कलाविष्कार सादर केले. कुणी गाणे म्हटले तर कुणी नृत्य केले. कुणी एकपात्री नाटक सादर केले तर कुणी कवितांची मेजवानी सर्वांना दिली. या पद्घतीने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. सरतेशेवटी चतुरंग कार्यकर्ता ओंकार केतकर याने सर्वांबद्दल ऋण व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?February 18, 2018
10.00 AM
ठिकाणपतित पावन मंदिर,रत्नागिरी
पत्तापतित पावन मंदिर,रत्नागिरी
प्रमुख पाहुणेडॉ. सुभाष देव

फोटो गॅलरी