शिक्षक – पालक – विद्यार्थी सुसंवाद

चतुरंग प्रतिष्ठानचे प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय (स्व) श्री. एस. वाय. गोडबोले सर यांच्या प्रेरणेतून गेली 32 वर्षे चतुरंगचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे उपक्रम कार्यान्वित आहेत. गोडबोले सर नेहमी म्हणायचे “शिक्षणविषयक काम हे फक्त विद्यार्थीवर्गापुरते कधीच मर्यादित नसते. विद्यार्थी – शिक्षक – पालक या तीनही घटकांचा एकत्रित , सर्वंकष विचार आणि कृती केली तरच शिक्षणाविषयीचे पूर्ण काम होऊ शकते. शैक्षणिक विचाराशी निगडित असलेल्या” शिक्षक – पालक – विद्यार्थी या तीनही घटकामध्ये एकमेकांविषयी काही शंका , आक्षेप ,प्रश्न असतात. त्या प्रश्नांची प्रयत्नपूर्वक उकल सहसा कधी होत नाही. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी ‘ आधी तुम्ही का आधी आम्ही?’ असे म्हणत कुणीच पुढे येत नसल्याने या अडचणींच्या मुद्यांची एक पारंपारीक कोंडी तयार होते! ही कोंडी फोडण्यासाठीच चतुरंग प्रतिष्ठानच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत ‘ आधी कोंबडी की आधी अंडे?’ हा सुसंवादी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी डी. बी. जे. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये सकाळी १० वाजता हा कार्यक्रम सुविहित चर्चा , प्रश्नोत्तरे स्वरूपात छान प्रकारे पार पडला. पालक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील शिक्षकांविषयीच्या शंका, आक्षेप ,प्रश्न नीट अभ्यासपूर्वक, मनमोकळेपणाने मांडले आणि शिक्षकांनी त्या प्रश्नांवरील सोल्युशन शोधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या जाहीर कार्यक्रमातून केला गेला. या कार्यक्रमासाठी “शिक्षक” या घटकाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी सर, सती चिंचघरी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. विनोद फणसे सर व आर. सी. काळे. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. विनायक माळी सर उपस्थित होते. त्याचबरोबर या सुसंवादात संवादकाची भूमिका घेऊन सुसुत्रता घडवून आणण्याचं काम श्री धनंजय चितळे सर यांनी पार पाडले. चारही शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच शिक्षणक्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले व्ही. व्ही. चिपळूणकर यांचे निधन झाले. संवादक धनंजय चितळे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर व्यासपीठावरील तीनही प्राचार्यांनी आपापल्या शिक्षण संस्थांबद्दल थोडक्यात माहिती दिली. थेट सुसंवादाचा प्रारंभ करताना ” इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षक व महाविद्यालयाचे शिक्षक यातील फरक काय? ” असा प्रश्न संवादक धनंजय चितळे उपस्थित केला. त्यावर या तीनही शिक्षकांनी आपापली मते मांडली. ” शालेय अवस्थेत शिक्षकांना मुलांच्या कलाने त्यांना शिकवत शिकवत त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करावी लागते. याउलट महाविद्यालयात अध्यापन पद्धतीत दुसऱ्या टोकाचा बदल दिसतो. विद्यार्थ्यांना स्वतःच्या हेतूनिहाय स्वतःच शिक्षण घ्यावे लागते. शिवाय शालेय जीवनात व्यक्तिमत्त्व विकासावर जास्त भर दिला जातो तर महाविद्यालयीन जीवनात संशोधनात्मक शिक्षणावर भर द्यावा लागतो. ” आजकाल विद्यार्थी स्पर्धेच्या मागे धावताना दिसतो. या मुद्द्याला धरून पुढचा प्रश्न आला “शिक्षक किंवा संस्थेचे यश विद्यार्थ्याच्या अंकावर/गुणांवर मोजणे कितपत योग्य आहे ?” या प्रश्नांवर उत्तर देताना प्राचार्य डॉ. जोशी सर म्हणाले “विद्यार्थ्याचे यश हे त्या त्या क्षेत्रातील त्याच्या प्रगतीवर अवलंबून असते , त्याच्या प्रगतीपुस्तकावर नाही.” आजचे पालक इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाकडे झुकताना दिसतात. अशा परिस्थितीत इंग्रजी भाषेच्या आग्रहाबद्दल व्यासपीठावरील शिक्षकांनी त्यांची मते मांडली. सध्याच्या युगात इंग्रजीला पर्याय नाही. मराठी ही जर मातृभाषा असेल तर इंग्रजी ही पितृभाषा असायला हवी असे सर्वांचे मत होते. त्यावर डी. बी. जे. महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. माने यांनी प्रतिवाद केला की ‘ ज्ञानाची भाषा इंग्रजी असण्याबद्दलचा आग्रह कितपत योग्य आहे? मराठी भाषेतही ज्ञानार्जन होऊ शकते ना? त्यावर व्यासपीठावरील मंडळीनी त्यांचे मत मांडले. जगात जर्मनी आणि जपान असे देश आहेत जिथे विद्यार्थी फक्त अनुक्रमे जर्मन आणि जापनीज् भाषेतच शिकू शकतात. सदर राष्ट्रांनी त्या भाषेस सर्वोच्च उंचीवर नेले आहे. परंतु अशी परिस्थिती आपल्या इथे पाहण्यास मिळत नाही. आपल्या इथे शुद्ध मराठी बोलता , लिहिता , वाचता येणाऱ्यांची संख्या फार कमी आढळते. त्यासाठी अगोदर आपल्या भाषेची अभिरुद्धी होणे जास्त गरजेचे आहे.
या कार्यक्रमास अनेक सुजाण नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती . त्यापैकी आर. सी. काळे महाविद्यालयातील प्रथमेश कदम या विद्यार्थ्याने “एक देश , एक अभ्यासक्रम” ही संकल्पना कितपत योग्य आहे असे विचारले. त्यावर प्राचार्यांचे मत असे होते की फक्त देश , राज्य किंवा जिल्हा पातळीवरच नव्हे तर प्रत्येक गाव पातळीनुसार अभ्यासक्रमात विविधता असली पाहिजे . देश पातळीनुसार एक अभ्यासक्रम ही संकल्पना प्रत्यक्षात फारशी उपयोगाची नाही.प्रत्येक घटकाच्या गरजा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येक स्तरावर ” अ, ब , क , ड ” अश्या पद्धतीचा अभ्यासक्रम असावा. त्यावर एक सुजाण शिक्षणप्रेमी नागरिक या नात्याने वनिता केळकर यांनी या प्रश्नावर उपप्रश्र्न केला. त्यांच्या मते सर्वांना समान शिक्षण घेण्याचा अधिकार असावा. कोणत्याही स्तरावरील विद्यार्थ्याला सर्व प्रकारचे शिक्षण घेता यावे. यावर डॉ. श्याम जोशी यांनी खुलासा केला ” प्रत्येक स्तरावरील वेगळे शिक्षणं हे त्या स्तराच्या गरजेच्या नुसार असावे. ज्या ठिकाणी ” अ ” पातळीची गरज आहे तिथे त्या पातळीवरील अभ्यासक्रम शिकण्याची व्यवस्था असावी व ज्या ठिकाणी “ड” पातळी वरील शिक्षणाची गरज आहे. तिथे त्या पातळीवरील शिक्षण मिळावं.” वनिता केळकर यांचा पुढील प्रश्न होता ” आज जर प्रत्येक घटक आपापले काम योग्य पद्धतीने करत असेल तरीही मग आजच्या घडीला त्यांच्यात अंतर्गतरित्या इतकी खळबळ का? ” यावर चतुरंग प्रतिष्ठान चे संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना ,” या प्रश्नावर शिक्षक घटक म्हणून तुमच्याकडून कोणते सोल्युशन असेल?” या बाबत अशी विचारणा केली. डॉ. जोशी यांच्या मते आजचे शिक्षण हे अप्रत्यक्षरित्या नियतीच्या हातात गेले आहे. आजचा शिक्षणातील प्रत्येक घटक हा आपली जबाबदारी हा पुढील घटकांवर ढकलत आहे. संस्था शिक्षकांना दोष देतात. शिक्षक पालकांना व पालक विद्यार्थ्यांना दोष देतात. विद्यार्थी हा घटक कोणत्याही नगण्य गोष्टींची कारणे पुढे करताना दिसतो. त्यामुळे ही खळबळ अधिक वाढत चालली आहे. यावरील सोल्यूशन म्हणजे प्रत्येक घटकाने आपपाल्या जबाबदाऱ्या १०० टक्के पूर्ण पाडाव्यात त्यामुळे बरेचसे प्रश्न आपोआपच सुटतील. याच निवेदनाला धरून पुढचा प्रश्न ” शिक्षकांना काही विशिष्ट कालावधीत आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, तो पूर्ण नाही झाल्यास विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांवरही तणाव येतो. यावर उपाय काय ?” असा प्रश्न सौ. मीनल ओक यांनी केला. त्यावर व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर शिक्षकांनी आपापल्या परीने त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले ‘पूर्वी शिक्षक घटकावर जबाबदारी जास्त असायची. आता परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थी घटकाचा जास्त सहभाग असावा अशी अपेक्षा आहे. बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांना याची जाणीव नाही. त्यांनी स्वविचाराने, स्वप्रयत्नाने त्यात सुधारणा करायला हवी. ” आजच्या स्पर्धेत विद्यार्थी मागे पडतो. कामाच्या ठिकाणी त्याला ताण येतो यावर उपाय काय? या मीनल ओक यांच्याच उपप्रश्र्नावर प्राचार्यांचे मत होते की ‘ज्या पद्धतीने स्पर्धा वाढत आहे त्या पद्धतीने संधी वाढत आहेत. स्पर्धेत जर दुप्पट पद्धतीने वाढ होत असेल तर संधीही चौपट प्रमाणात वाढताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याना कोणत्या एका तरी गोष्टीत अग्रेसर होणे गरजेचे आहे.’ अमित शेवडे यांनी विचारले ” शिक्षक – पालक – विद्यार्थी या त्रिकोणात किती अंशाचा कोन आहे?” त्यावर प्राचार्य म्हणतात” विद्यार्थी – पालक – शिक्षक यांचे सध्याच्या शिक्षणप्रणाली त ४०:४०:२० या प्रमाणात योगदान असायला हवे. त्यावर धनंजय चितळे यांनी प्रश्न केला ” शिक्षक घटकाने अधिक जबाबदारी घेऊन त्या गोष्टीत पुढाकार घ्यायला हवा असल्यास त्यांचे योगदान हे २० टक्के इतके कमी कसे असू शकते. ” यावर व्यासपीठावरील प्राध्यापकांचे असे मत होते की ‘शिक्षक हा जेवणातील मीठाप्रमाणे असतो त्याचे योगदान कमी दिसले तरी ते दर्जानुसार अधिक महत्त्वाचे असते. या शिक्षणक्षेत्रात रस निर्माण करण्याचे काम शिक्षक घटक करत असतो. शिक्षणात अधिक रस घेण्याचे काम विद्यार्थी घटकाने केले पाहिजे. ” याच मुद्याला प्रा. विनोद फणसे सरांनी पुस्ती जोडली की,” नुसते आकडेवारीने जाण्याला फारसे महत्त्व नाही. योगदान आकड्यामध्ये संख्यात्मक पद्धतीने मोजण्यापेक्षा गुणात्मक पद्धतीने व्हायला हवे. आम्ही शिक्षक ५० टक्केही योगदानाची जबाबदारी स्वीकारू पण त्याच वेळी विद्यार्थी आणि पालक दोघांनीही आपापली २५/२५ टक्क्यांची जबाबदारी पूर्णांशाने निभावली पाहिजे. प्रामाणिकपणे त्यासाठी अपेक्षित कृती केली पाहिजे.”
कार्यक्रमाच्या शेवटाकडे आल्यावर धनंजय चितळे यांनी ” या सर्व गोष्टी सकारात्मक पद्धतीने होण्यासाठी ‘ शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? ” असा प्रश्न सर्व प्राचार्यांना केला. “आदर्श व सुजाण नागरिक घडावा या दृष्टीने आम्ही जिद्दीने प्रयत्न करू. विद्यार्थी विकसित व्हावा, समाजभिमुख व्हावा, यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील राहू” असे आर. सी. काळे कॉलेज चे प्राचार्य विनायक माळी सर यांनी म्हटले तर “मी माझ्या पदापासून कधीही ढळणार नाही. मी २४ तास शिक्षक म्हणूनच राहीन” असे वचन डॉ. श्याम जोशी यांनी उपस्थित श्रोत्यांना दिले. विनोद फणसे सर म्हणाले ” चतुरंग प्रतिष्ठानने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे याला आम्ही तडा जाऊ देणार नाही.” सुसंवादाचा समारोप करताना , प्रचलित प्रश्नांची कोंडी फोडण्यासाठी आज या व्यासपीठावरून ‘ शिक्षक घटकांच्या बाजूने जी जी उत्तरे , सोल्युशन मांडण्यात आली , त्यांची अंमलबजावणी , त्यांनी आपापल्या महाविद्यालयात आपापल्या शिक्षकांद्वारा लगेचच सुरू करावयाची आहे. पुढील ४-६ महिन्यात त्याचे चांगले परिणाम लक्षात आल्यावर पुढच्या वेळेच्या कार्यक्रमात ‘ पालक घटकाला ‘ व्यासपीठावर उपस्थित राहून अडचणींवर मात काढणारी त्यांच्या बाजूची उत्तरे , सोल्युशन द्यायची आहेत. अशा पूर्वनियोजित मुद्यांची आठवण श्री. धनंजय चितळे यांनी शिक्षक – पालक आणि चतुरंगला जाहीरपणे करून दिली . त्यानंतर या सुसंवादात खूपच उत्तमरीतीने सहभागी झालेल्या सर्वच घटकांच्या प्रती , चतुरंग कार्यकर्ती सोनल सकपाळ हिने खूपच छानप्रकारे कृतज्ञता व्यक्त केली. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाल्यावर एकूणच कार्यक्रमाबद्दल आढवात्मक प्रतिक्रिया करताना, यावेळी विद्यार्थी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहूनही , प्रत्यक्ष संवादात मात्र खूपच कमी प्रमाणात सहभागी झाल्याची खंत , चुटपुटत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसली. पण एकूण उपक्रम , ‘ आधी कोंबडी की आधी अंडे?’ या पारंपारिक वादावर उत्तर शोधण्यात बऱ्यापैकी प्रमाणात यशस्वी झाल्यासारखा वाटला हे निश्चित!

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?September 22, 2018
9.00 AM
ठिकाणडी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण
पत्ताडी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण

फोटो गॅलरी