पालक मेळावा – रत्नागिरी

कुटुंबवत्सलतेचा अनुभव देणारा ‘चतुरंग-पालक मेळावा’
गेली ४३ वर्षे चतुरंग प्रतिष्ठान सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. मुंबई, डोंबिवली, चिपळूण, पुणे, गोवा पाठोपाठ आता रत्नागिरीतही चतुरंगचं केंद्र स्थापन होत आहे. या केंद्रातील सर्व कार्यकर्ते हे चतुरंगच्या अभ्यासवर्गाचे विद्यार्थी आहेत. या वर्गामुळे काही वर्षांपूर्वी चतुरंगशी जोडलेली नाळ आजही ‘चतुरंगसाठी’ कायम आहे.
या सर्व रत्नागिरीतील कार्यकर्त्यांचा कौटुंबिक मेळावा सोमवार दि.२ ऑक्टोबर रोजी कार्यकर्त्यांचे पालक, मित्रपरिवार आणि चतुरंगचे रत्नागिरीतील हितचिंतक, मान्यवर यांच्या उपस्थितीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर सुखटणकर आणि अमृता ट्रॅव्हल्सच्या सौ.अमृता करंदीकर यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. किशोर सुखटणकरांनी चतुरंगच्या रत्नागिरीतील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. सुखटणकर म्हणाले की, “चतुरंगचे रत्नागिरीतील उपक्रम खुप चांगल्या पद्धतीने चालले आहेत. महाविद्यालयातील शिकणाऱ्या चतुरंगच्या कार्यकर्त्यांना कायमच पाठिंबा देऊ व मदत करू.”
कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यकर्ता यश कापडी याने केली. यानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मनोगते मांडली. ओंकार केतकर याने रत्नागिरीमध्ये चतुरंगची सुरुवात कशी झाली ते छान सांगितले. तसेच चतुरंगचं प्रत्येक कामातील नियोजन आणि नाविन्यता कशी असते ते सांगितले. आदित्य मयेकरने नोकरीतील जबाबदारी सुद्धा चतुरंगमुळे शिकायला मिळाली असं सांगितलं. दत्तात्रय करकरेने नियोजन यशस्वी कसं होतं ते सांगितलं आणि ताईला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मिळतानाच मनात आलं होतं की आपण सुद्धा चतुरंगचं काम करावं असं सुद्धा सांगितलं. ‘संगत’ हा विषय घेऊन चतुरंगविषयी मनोगत मांडणारा श्रीहरी करंदीकर हा अभ्यासवर्गातील नसून सुद्धा चतुरंग-रत्नागिरी मधील महत्वाचा घटक बनला आहे. मूळचा वहाळचाच असलेला सुजय काशीद याने निवासी वर्गाच्या माहितीच्या माध्यमातून मनोगत मांडले. सौरभ शिर्केने भावी आयुष्यात चतुरंगमुळे आपल्याला काय काय मिळू शकते हे सांगितले. मधुरा काळेने आपले मनोगत मांडताना चतुरंगमध्ये काम करतानाचा अनुभव सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती करकरने केले आणि विविध भागांतील सूत्रसंचालन रेवती गद्रे, सुशांत केतकर आणि तेजा नवले यांनी केले.
नुकतेच नर्मदा परिक्रमा करून आलेले दापोलीचे डॉ. राजा दांडेकरांनी आपले अनुभव कथन केले. परिक्रमेत येणाऱ्या अडचणी आणि आयुष्यातील अडचणी यांचा समन्वय साधून आपले विचार मांडले. त्यानंतर चतुरंग म्हणजे काय? आणि चतुरंगचा आजपर्यंतचा प्रवास याविषयी श्री. विद्याधर निमकर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला.
‎त्यानंतर चतुरंगची कार्यकर्ती कु.मधुरा काळे हिची छोटेखानी गाण्याची मैफिल झाली. निवेदनासाठी चतुरंगचीच कार्यकर्ती नेत्रा केळकर ही होती. कार्यक्रमासाठी श्री. विलास हर्षे आणि श्री. केदार लिंगायत यांची साथ लाभली. कार्यक्रमासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर सुखटणकर,पत्रकार श्री.युयुत्सु आर्ते तसेच श्री.प्रमोद हर्डीकर,सौ.प्राची जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. सर्व पालक ,मान्यवर आणि कार्यकर्ते यांच्याविषयी ऋण कार्यकर्ती श्रद्धागौरी मराठे हिने व्यक्त केले. सुमारे चार तास रंगलेल्या कार्यक्रमाचा समारोप भोजनाने झाला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?October 2, 2017
3.00 AM
ठिकाणराधाबाई शेट्ये सभागृह,गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
पत्ताराधाबाई शेट्ये सभागृह,गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
प्रमुख पाहुणेकार्यकर्त्यांचे पालक, मित्रपरिवार आणि चतुरंगचे रत्नागिरीतील हितचिंतक

फोटो गॅलरी