आगळा वेगळा “मैत्र”

ऑगस्ट महिना सुरू झाला की श्रावणाच्या सरींसोबत “फ्रेंडशिप डे” चेही चमकते कवडसे कॉलेज मध्ये पडू लागतात. खरंतर मैत्रीसाठी एखादा विशिष्ट दिवस नसतोच. परंतु “फ्रेंडशिप डे” ला एकमेकांच्या हातात बँड बांधून मैत्रीचे बंध दाखविण्याचा मानस नकळत कॉलेज जीवनात रूढ झाला. याचा हेतू जरी स्पष्ट असला तरी याचं बदललेल स्वरूप हे “मैत्री” या संज्ञेला तितका न्याय देत नाही. वर्षभर आपल्या जवळ असलेल्या मित्र-मैत्रिणीच्या हातात बँड बाधून खरंतर वेगळं असं काहीच साध्य होत नाही.उलट आपल्या मैत्रीचा परीघ तितकाच आखूड बनतो. फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने नव्या विषयांशी , नव्या क्षेत्रांशी, नव्या कलेशी मैत्री झाली तर?…….
45 वर्षे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असल्याने चतुरंगी मनात या प्रश्नाचा पाठपुरावा करुसा वाटणे साहजिकच होते. सुमारे 10-11 वर्षांपूर्वी दि. 21 ऑगस्ट 2008 रोजी डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथे चतुरंग प्रतिष्ठानने एक नवा प्रयोग केला होता. मैत्री दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळींशी गप्पा-गोष्टीं साधत त्या विषयांशी, पर्यायाने त्या मान्यवरांशी मैत्री करण्याची संधी कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मिळाली होती. यावेळी दि. 3 ऑगस्ट 2019 अशाच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने चतुरंग प्रतिष्ठान व गोगटे जोगळेकर महाविद्यालय प्रतुत “अष्टरंगी मैत्र” या उपक्रमाअंतर्गत नव्या विषयांशी मैत्री करण्याची एक सुवर्ण संधी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाली. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहवास लाभावा व त्या विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा महत्वाचा हेतू होता. जागतिक पोर्ट्रेट पेंटर सुहास बहुळकर, संगणक तज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले, सुप्रसिद्ध नृत्यांगना- नृत्यगुरु सोनिया परचुरे, सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर, युवा पिढीतील लोकप्रिय अभिनेता – दिग्दर्शक आलोक राजवाडे, पत्रकार-संवादक सुधीर गाडगीळ व कोकणच्या मातीतील सुप्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोळकर अशा आठ नामवंतांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. डिपॉझीट सिस्टीम नुसार दि. 23 ते 25 जुलै या दिवसात 400 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी केली होती. दि. 2 ऑगस्टच्या दुपारपासून सुमारे पन्नास – एक चतुरंगींनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहाचे प्रांगण या संकल्पित “मैत्र” मेळाव्यासाठी सुशोभित करण्यास सुरुवात केली होती. 8 वेगवेगळ्या वर्गात 8 मान्यवरांना स्थानापन्न करण्यात येणार होते. एक एका वर्गात एक – एका मान्यवरांशी 50 जणांच्या ग्रुप ने गप्पा मारता येतील अशी वर्गातील बाकांची मांडणी करण्यात आली होती. वर्गातील फळे आणि वर्गाची प्रवेशद्वारे आतल्या गप्पागोष्टींचे स्वरूप सुचविण्याइतकी सुशोभित करण्यात आली होती. पाऊस नसला तर कसे किंवा पाऊस आलाच तर कसे ? याचाही विचार या वर्गमांडणीत करण्यात आला होता. दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली. उपस्थितांची नावनोंदणी आणि डिपॉझीट रिफंड करून मगच त्यांना सभागृहात प्रवेश दिला जात होता. सकाळी ठीक 8 च्या सुमारास सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात व निमंत्रित मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते. एका छोटेखानी स्वागत समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अदिती जोशीच्या मैत्रविषयक स्वागतगीताने वातावरण संमोदित करून टाकले. चतुरंग कार्यकर्ती उत्कर्षा प्रभुदेसाई हिने मैत्र मेळाव्याची संकल्पना विस्तृतपणे विषद केली. सूत्रसंचालन करणाऱ्या श्री वैभव कानिटकर सरांनी या प्रत्येक मान्यवर कलावंताचा छोटेखानी परिचय सांगत या आठही मान्यवरांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर सरांच्या हस्ते पुष्प आणि अत्तरकुपीने सुगंधित स्वागत घडवले. यानंतर विद्यार्थ्यांना पुढील साडेचार तासांच्या मेळाव्याची नेटकी कार्यक्रम रचना सांगून झाल्यावर ठीक 9 वाजता ठरवलेल्या खोलीमध्ये जाऊन त्या त्या मान्यवरासह मनमोकळ्या गप्पागोष्टी करण्यास सुरुवात केली.
आपापल्या आवडीनुसार विद्यार्थी विविध तज्ज्ञांशी सहवास – संवाद साधत होते. जागतिक पोर्ट्रेट पेंटर सुहास बहुळकर यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 1878 पासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट च्या संग्रहालयातील जुन्या चित्रांच प्रदर्शन भरवण्याची संधी बहुळकर सरांना मिळाली होती. जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांची 75 हून अधिक प्रदर्शने भरवली गेली आहेत. राष्ट्रपती भवनातील लोकमान्य टिळकांच्या पोर्ट्रेट संबंधी आलेल्या अनुभवांवर त्यांनी भाष्य केले. “एखाद्या घटनेची किंवा संवादाची मांडणी एखाद्या चित्रातून देखील कशी करता येऊ शकते?” या विषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चित्रातील महत्वाच्या खाणाखुणा त्या चित्राचा गाभा बनतात. याविषयी त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. चित्रकलेत आवड असलेल्या व त्याच बरोबर चित्रकलेत करीयर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुळकर सरांचं मार्गदर्शन नक्कीच मोलाचं ठरलं असेल. एका बाजूला चित्रकलेच्या स्ट्रोक्स संबंधी गप्पा गोष्टी सुरू होत्या तर दुसऱ्या वर्गात सामाजिक क्षेत्रातून मिळणारा आनंद डॉ. प्रसाद देवधर त्यांच्या ओघवत्या वाणीतून विद्यार्थ्यांसमोर मांडत होते. पेशाने डॉक्टर असताना सामाजिक , आर्थिक प्रतिष्ठा बाजूला ठेवून “भगिरथ ग्रामविकास संस्थे”मार्फत तळागाळार्यंत काम करण्यात डॉक्टर देवधर यांना कसे समाधान मिळत होते ते सांगताना बाहेरील रुपापेक्षा अंतःकरणातील सौंदर्य हे अधिक महत्त्वाचे असल्याचे विस्तृतपणे विषद केले. ” सामाजिक क्षेत्रात काम करताना आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? ” असा प्रश्न विचारल्यावर डॉ. देवधर उत्तरले, ” आज तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येत आहे हा देखील एक सर्वोत्तम क्षण असतो. ” ABVP च्या माध्यमातून सामाजिक कार्याला प्रेरणा मिळाली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. चाकणला झालेल्या भूकंपात प्रेतं उचलण्याचे काम करताना आलेले अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. मैत्रीसाठी दिवस महत्वाचे नसतात तर एखादा क्षणही आयुष्यभराच्या मैत्रीसाठी पुरा पडतो असे त्यांचे म्हणणे होते. डॉक्टरी पेशातून सोशिओलोजी कडे वळल्यावर माणसं ओळखण्याचा स्वभाव हा फार उपयोगी पडला असं त्यांचं म्हणणं होतं. माणसं वाचणं हा माझा आवडता छंद आहे असे ते म्हणत होते. सामाजिक कार्यातील आनंद हा अत्युच्च दर्जाचा असतो व हा आनंद क्षणिक नसून तो चिरंतन टिकतो असे त्यांचे प्रामाणिक मत होते.
संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाची ओळख करून देण्यासाठी व त्यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी अच्युत गोडबोले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आयआयटीमधून केमिकल इंजिनिअर पदवी मिळवल्यानंतरही संगणक व सॉफ्टवेअरसारख्या दुसऱ्या टोकाच्या क्षेत्रात प्रवेश करून त्यांनी 32 हून अधिक कंपन्यांमध्ये त्यांना कामाचा अनुभव मिळवला. त्यांनी शालेय जीवनातील त्यांच्या प्रवासाचा उल्लेख केला. सोलापूरसारख्या शहरात त्यांच्यावर झालेली सांस्कृतिक जडणघडण ही त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांसारख्या दिग्गजांच्या मैफिलीत ते दंग होत असतं. आयआयटीमध्ये असताना त्यांना लाभलेली संगत ही त्यांच्या बौद्धिक विकासासाठी महत्वाची होती. त्या दरम्यान त्यांच्या स्वभावात , विचारत झालेले बदल या संबंधी त्यांनी दिलखुलास चर्चा केली. विज्ञानातील ” किमयागार”, मानसशास्त्रावरील ” मनात” , अर्थशास्त्राशी संबंधित “अर्थात” , “बोर्डरूम”, “गुलाम” इत्यादी विविध स्वरूपाचे लेखन करत असताना त्यांनी त्या विषयावर भरभरून प्रेम करत असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नातून चर्चा अधिक रंगत गेली. विविध विषयाचं सखोल ज्ञान असणाऱ्या या ” मुसाफिराचा” प्रवास जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक होते. भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्रातील आव्हानांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. भारताला मागील 70 वर्षात विज्ञानात एकही नोबेल पारितोषिक मिळालेले नाही याकडे लक्ष वेधत आपल्याकडील शास्त्रज्ञ भारतात न राहता परदेशात जाऊन तेथे संशोधन करणं उचित मानतात ही गोष्ट त्यांनी त्यांच्या संवादातून अधोरेखित केली. या सर्व गोष्टी भारताच्या विकासासमोरील आव्हानेच आहेत असे त्यांचे म्हणणे होते.
कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नाटकाच्या / एकांकिकांच्या बाबतीत फार उत्सुकता असते. विविध एकांकिका स्पर्धांमार्फत त्यांच्यातील प्रतिभेला वाव मिळतो. तरुण रंगकर्मींबद्दल तरुणाईला फार आकर्षण असते त्यामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता – दिग्दर्शक आलोक राजवाडे याच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये एक जल्लोष निर्माण झालेला दिसला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढीची उत्सुकता दिसली. त्याच्या करिअर संबंधी, अभिनयाच्या प्रवासा विषयी विद्यार्थ्यांनी त्याला बोलते केले. पुण्याच्या BMCC महाविद्यालयात नाट्य क्षेत्राशी नाळ जुळत गेली. पुढे नाटक कंपनी, भाडीपाच्या माध्यमातून कलेला मिळालेला वाव या सर्व रम्य आठवणींना त्यांने उजाळा दिला. नाटकादरम्यान घडलेल्या विविध गंमतीजमती त्याने दिलखुलासपणे विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या. नाटक आणि सिनेमा या दोन्ही माध्यमातील फरक त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई एकांकिका स्पर्धेतील त्याच्या सहभागाचा आणि सवाई पद मिळवण्याच्या आठवणीत तो रमताना दिसत होता. आलोक राजवाडे याच्या कासव चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कासव चित्रपटातील भूमिका बजावण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यामागील प्रेरणा , त्या भूमिकेचा उद्देश यासंबंधी तपशिलानिशी अनुभव शेअर केले.
आपल्या मुलीने नृत्याच्या क्षेत्रात आपलं करियर करायचं ठरवलं तर बहुतांश पालकांचा सूर हा नाराजीचा असतो. ‘नाचगाणी’ या गोष्टी फक्त छंद जोपासण्यासाठी योग्य आहेत परंतु करिअरच्या दृष्टिकोनातून तो शाश्वत पर्याय नाही असा बहुतेक पालकांचा समज असतो ; परंतु सोनिया परचुरे यांचे पालक यास अपवाद होते. तिने निवडलेल्या क्षेत्रात करियर निवडण्यासाठी तिच्या पालकांचा पूर्णपणे पाठिंबा होता. नाटकातील अभिनयानंतर तिने निवडलेल्या नृत्य क्षेत्रात 30 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या सोनिया ताई आज नृत्यांगणाच नव्हे तर नृत्यगुरु म्हणून सुपरिचित आहेत. आजच्या कार्यक्रमात बोलताना आपल्या संस्कृतीबद्दल प्रत्येकाच्या मनात अस्मिता असावी असे त्यांचे मत होते. मुलींच्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांनी क्लासिकल डान्स व रेकॉर्डेड डान्स यामधील फरक नेमकेपणाने समजावून सांगितला. क्लासिकल विभागात चेहऱ्यावरील भावांच महत्त्व जास्त असतं व त्यातून त्या कलाकृतीला अधिक न्याय मिळतो असे त्यांचे मत होते.
पुढच्याच वर्गात तबला आणि हार्मोनियमच्या साथीत सुमधुर आवाजाचे स्वर लहरत होते. एखादं गाणं तयार होताना त्यात गीतकार व गायक याच बरोबर संगीतकाराची ही तेवढीच मेहनत असते. गाण्याला चाल लावताना त्या चालीतून संगीतकार गीतकाराच्या शब्दाला व गायकाच्या आवाजाला अधिक न्याय देत असतो. 500 हून अधिक मालिकांची शीर्षक गीते संगीतबद्ध करणारे अशोक पत्की यांनी संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. गाण्याची चाल जन्माला येताना त्यामागील विविध किस्से त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सुमारे आठ हजारहून अधिक दिलखेच झिंगल्सना चाली देऊन ते लोकप्रिय करणारे अशोक पत्की विद्यार्थ्यांना जवळचे न वाटले तर नवलच. गाणं रचत असताना त्यातील अडचणी, निर्मात्यांशी होणारे मतभेद याविषयीही त्यांनी अनुभवांचे प्रामाणिकपणे कथन केले. वयाची 8 दशके ओलांडलेला हा थोर संगीतकार विशीतील मुलामुलींचा खूप अलगदपणे मित्र बनून जातो हे मुलांच्या डोळ्यातून पाझारताना दिसत होते.
पुण्याच्या BMCC महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अभ्यास करता करता सुधीर गाडगीळ यांना मुक्त पत्रकारिता या क्षेत्राने भुरळ घातली . सहज संवादाची कला अवगत असलेल्या या अवलियाने आजवर बाळासाहेब ठाकरे , लता मंगेशकर , नारायण मूर्ती , माधुरी दीक्षित अमिताभ बच्चन यांसारख्या 3500 अधिक मातब्बर मंडळींना आपल्या मुलाखतीतून बोलतं केलं आहे. एखादी गोष्ट करताना त्याच्या दोन्ही टोकांच्या (बऱ्या – वाईट) परिणामांची शक्यता आधीच आजमावून घेतली तर पुढे कोणतीही भीती उरत नाही असे त्यांचे मत होते. रोजनिशी लिहिण्यासारख्या छोट्या छोट्या सवयींचा व्यक्तिमत्त्व घडताना होणारा फायदा त्यांनी स्वानुभवातून कथन केला. मुलाखती घेताना, देशीविदेशीचे दौरे करताना आलेले अगणित अनुभव त्यांनी हसत खेळत विद्यार्थ्यांसमोर मांडले आणि संवादकला ही संपूर्ण करियरचा एक विषय असू शकते हे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर उभे केले.
मोजक्या पाचसात मिनिटात हातातील ब्रश आणि समोरच्या रंग बाटल्यांचा आधारे स्तिमित होऊन पाहावं असं सुंदर चित्र निर्माण करण्याची कला असणारे कोकणच्या मातीतील चित्रकार अरुण दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रात्यक्षिकं करून दाखवली. चित्रकाराने लोकांच्या आवडीलाही तितकेच महत्त्व द्यावे असे त्यांचे मत होते. आपल्या सभोवतालचा विविधरंगी निसर्ग कॅनव्हासवर हुबेहूबपणे उतरवण्याच्या या कलेने जीवनात अनेक आनंदाचे क्षण दिले असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. केवळ पर्यावरणाचा विचार करून आपल्या चित्रांच्या चौकटी लाकडी ठेवण्यावर त्यांनी भर दिलेला दिसला. कोकणातील वातावरणात मोठ्या झालेल्या अरुण दाभोळकर नामक चित्रकाराला आपल्या चित्रातून कोकणातील नैसर्गिक सामर्थ्य दर्शवून आपले जीवन समर्थपणे घडवता येते असा संदेश समोरच्या मुलांना आपल्या उक्ती आणि कृतीतून दिला. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी या अष्टकलावंतांशी नवे “मैत्र” जोडण्याच्या संधीचा लाभ घेतला.
सुमारे सव्वा दोन तासांच्या मैत्र मुशाफिरी नंतर पुन्हा सर्व विद्यार्थी व मान्यवर कलाकार महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात एकत्र आले. बहुविध क्षेत्रातील मातब्बरांशी झालेल्या नवपरिचयाचे पडसाद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. चतुरंग कार्यकर्ता सुशांत केतकर याने ‘मैत्र प्रयोगाची संकल्पना आणि वास्तवात उतरलेले स्वरूप’ याचा ताळेबंद सर्वांसमोर मांडला. महाविद्यायातील प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होत्या. चिठ्ठीतून नावे आलेल्या निवडक विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात नव्याने जुळलेल्या मैत्रीबद्दलचे त्यांचे अनुभव सर्वांसमोर मांडले. काहींना कलाकाराच्या मनमोकळे पणाने भुरळ घातली तर काहींना आयोगाकांच्या व्यवस्थापनाचे नवल वाटले. काहींनी मागील दोन तासातील घडलेल्या संवादावर आपली प्रतिक्रया दिली तर काहींनी भविष्यासाठी मिळालेल्या प्रेरणेची ग्वाही दिली. त्यानंतर व्यासपीठावरील विविध कलावंतांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या गप्पा गोष्टीबाबत आपली मनोगत व्यक्त केली. जडण घडणीच्या वयात असताना इतकं पोषक वातावरण मिळाल्यामुळे सुहास बहुळकर यांना विद्यार्थ्यांचा हेवा वाटू लागला. गाणे हे अंगभूत असते पण गुरु त्याला पैलू पाडतो त्यामुळे स्वच्छंदी व्हा, अभ्यास करा, भरपूर रियाज करा असा अशोक पत्की यांनी मोलाचा सल्ला दिला. अभ्यास आणि मार्क्स यापेक्षाही आयुष्य वेगळे आहे व त्याची जाणीव लवकरात लवकर व्हावी असे अच्युत गोडबोले यांनी सांगितले. वडील मुलाला ज्यापद्धतीने खांद्यावर घेतात आणि उंचावरून त्याला सभोवतालचे विश्वदर्शन घडवतात त्याप्रमाणे चतुरंगने आपल्या उपक्रमातून या सर्व विद्यार्थ्यांना जणू काही आपल्या खांद्यावर घेऊन या नव्या जगाची तोंडओळख करून दिली आहे अशा शब्दात डॉ. प्रसाद देवधर यांनी चतुरंग कामाचे कौतुक केले. चतुरंग बरोबरच साथ देणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक टीम व भरभरून प्रतिसाद देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने ते प्रभावित झालेले दिसले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुखटणकर सर यांनी या कार्यक्रमा संबंधित महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाअखेरीस चतुरंग प्रतिष्ठानचे संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी हा नवा उपक्रम यशस्वी करण्यात सहभागी असलेल्या सर्व निमंत्रित कलाकार, पत्रकार , महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांबद्दल ऋणपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी चतुरंगच्या तरुण कार्यकर्त्यांनी मागील महिनाभर कमालीची मेहनत घेतली होती त्यापैकी यश कापडी, सुशांत केतकर, शौनक खरे, सुयोग रानडे, स्वरूप बोंडकर त्याचं बरोबर सई विद्वांस, उत्कर्षा प्रभुदेसाई, रेवती गद्रे, अदिती जोशी इत्यादी कार्यकर्त्यांचा कौतुकपूर्ण उल्लेख विद्याकाकांनी आपल्या बोलण्यातून केला.तसेच या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव सर , ‘दैनिक सागर’च्या संपादिका श्रीम. शुभदा जोशी व सर्वमित्र युयुत्सू आर्ते यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चतुरंग प्रतिष्ठानने कार्यक्रमाचे आयोजन केले असले तरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सर्व घटकांमध्ये सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन करताना महाविद्यालयातील प्राध्यापक टीमने सहकार्य केले आणि कार्यक्रमासंबंधी छान अशी पूर्वतयारी करून घेतली त्याबाबत श्री. प्रभात कोकजे , श्री. श्रीकांत दुदगीकर या शिक्षकांप्रती विद्याकाकांनी कृतज्ञता भाव व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयापुरता एकांगी विचार न करता चौफेर व्हावं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. पुलंनी म्हटल्याप्रमाणे “साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.”या पुलं च्या या उक्तीचा प्रत्यय उपस्थित विद्यार्थ्यांना आला असावा. अशाप्रकारे “अष्टरंगी मैत्र ” या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनातील “मैत्र” या संकल्पनेला एक छानशी कलाटणी दिली असावी हे नक्की!!!

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?August 3, 2019
8.00 AM
ठिकाणगोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
पत्तागोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
प्रमुख पाहुणेअशोक पत्की, आलोक राजवाडे, अच्युत गोडबोले, सुधीर गाडगीळ, सोनिया परचुरे, डॉ. प्रसाद देवधर, अरुण दाभोळकर आणि सुहास बहुळकर

फोटो गॅलरी