कथा स्वातंत्र्याची.. गाथा बलिदानाची..

चतुरंग प्रतिष्ठान ने मागच्या वर्षी सुरु केलेल्या स्वातंत्र्याचे पूर्वरंग ह्या उपक्रमाला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता त्यामुळे ह्यावर्षी सुद्धा असाच काहीसा कार्यक्रम कीर्तनप्रेमी रत्नागिरी कर रसिकांसाठी साजरा झाला. सलग दुसऱ्या वर्षी लोकाग्रहास्तव कीर्तनचंद्र श्री.श्रेयस बडवे आणि सौ.मानसी बडवे यांनी पुन्हा एकदा लोकांना खिळवून ठेवणारी कीर्तनाची जुगलबंदी सादर केली.
ह्या वर्षीचे विशेष म्हणजे “कथा स्वातंत्र्याची गाथा बलिदानाची ” अशा विषयावर जुगलबंदी सादर झाली. कीर्तनप्रेमी असणाऱ्या रत्नागिरी करांना देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या निरुपणाने भारावून सोडले.
माधवराव मुळे भवन येथे रात्रौ १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली.चतुरंगप्रथेप्रमाणे बडवे दांपत्य आणि साथीदार यांचे स्वागत करण्यात आले.चतुरंग कार्यकर्ती कु.सीमंतीनी जोशी हिने प्रास्ताविक करताना ह्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली.वाचनालयाचे अध्यक्ष श्री.दीपकजी पटवर्धन यांचा त्यांना मिळालेल्या मोठ्या जबाबदारीबद्दल सत्कार करण्यात आला.
रामदासांच्या एका अभंगावरून सुपुत्र कसा असावा आणि कराग्रे वसते लक्ष्मी यावरून सुकन्या कशी असावी अशा आशयाने कीर्तनाची सुरुवात झाली. जुगलबंदी हि कथा स्वातंत्र्याची गाथा बलिदानाची अशी होती आणि त्यात आज चा सामाजिक विषय सुपुत्र आणि सुकन्या असा एक वेगळा प्रयोग खूप काही सांगून गेला. पूर्वार्धात सुपुत्र आणि सुकन्या असे अनेक दाखले देऊन विषय लोकांपर्यंत पोहोचवला.
मध्यांतरात “श्रीमंत नारायण …” ह्या अभंगाचा किर्तनप्रेमींनी आस्वाद घेतला.कीर्तन हा विषय मनापर्यंत पोहोचणारा असल्यामुळे किर्तनानंतर मधेच व्यत्यय नको म्हणून चतुरंग कार्यकर्ती कु.मयुरी केतकर हिने मध्यांतरात ऋणनिर्देश केले आणि पुन्हा एकदा सर्व जण कीर्तनात दंग झाले.
उत्तरार्धात मानासीताईंनी झाशीची राणीचे बालपण , त्यांचे शौर्य आणि त्यांच्या जीवनातील चिकाटी , शेवटपर्यंत लढण्याचा ध्यास अशा सगळ्या गोष्टी रसिकांपर्यंत पोहोचवल्या.आणि त्यावर सुपुत्र या आशयाने बोलताना शिवाजी महाराजांचे साथीदार तानाजी मालुसरे हे एक समर्पक उदाहरण घेतले.कोंढाणा काबीज करताना घडलेला सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला एवढी त्यात ताकद होती.
ह्या दोन गोष्टींचा शेवट करताना आज च्या काळात अशा सुपुत्र आणि सुकन्यांची कशी गरज आहे ते मांडले त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास अशक्य असे काही नाही.
संपूर्ण कीर्तनात किर्तनाबरोबरच अभंग आणि आणि अशा अनेक गोष्टींतून साथीदारांनी वाद्यांच्या सूर आणि ठेक्यातून सर्व रसिकांना खुश केले होते.
शेवटी “बलसागलर भारत व्होवो..”ह्या देशभक्तीपर गीताने देशाचे प्रेम व्यक्त केले आणि वंदे मातरम् ने जुगलबंदीची सांगता झाली.
राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या सर्व रसिकांनी कॉफी चा आस्वाद घेऊन आनंदात निरोप घेतला….

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?August 14, 2019
10.00 PM
ठिकाणवैद्य सभागृह, माधवराव मुळे भवन, शेरे नाका, रत्नागिरी
पत्तावैद्य सभागृह, माधवराव मुळे भवन, शेरे नाका, रत्नागिरी
प्रमुख पाहुणेश्री. श्रेयस बडवे आणि सौ. मानसी बडवे

फोटो गॅलरी