गुणवंत गौरव सोहळा २०१७

चिपळूण : चतुरंग प्रतिष्ठानच्या निर्धार निवासी व निवासी अभ्यासवर्गाला असलेल्या व दहावीच्या वर्गात उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली ती ख्यातनाम वृत्तविश्लेषक पत्रकार व झी २४ तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकरजी यांची . त्याचबरोबर अभिनेत्री मृणाल देव – कुलकर्णी व शिक्षक मुख्याधापक विनोद फणसे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विठ्ठलाला जशी त्यांच्या वारकऱ्यांची ओढ लागते तशीच चतुरंगच्या कुटुंबाला दहावीचे निकाल लागले की त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भेटीची ओढ लागते अशा प्रकारे निवेदिका इंद्रायणी दिक्षित यांनी विद्यार्थ्यांबद्दलची आपुलकी व्यक्त केली. या वर्षी २८ शाळांतील ५८ विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वहाळ येथे झालेल्या निवासी वर्गाला हजेरी लावली. या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. तसेच ३ टप्प्यांमध्ये झालेल्या निर्धार निवासी वर्गाला ४८ विद्यार्थी उपस्थित होते. निर्धार वर्गासाठी आलेले विद्यार्थी हे नववीतून प्रमोट केलेले किंवा काठावर पास झालेले असले तरीही त्यांनीही या परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे. सती-चिंचघरी हायस्कूलचे मुख्याधापक विनोद फणसे करियर बद्दल मार्गदर्शन केले. डॉक्टर इंजिनियर या क्षेत्रांखेरीज अनेक क्षेत्र अस्तित्वात आहेत व त्या क्षेत्रांकडे पाहण्याचे आव्हान सरांनी केले. डॉ. उदय निरगुडकर व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. निवासी वर्गाला असलेल्या श्रीरंग रायरीकर या विद्यार्थ्याला ९८% मार्क्स मिळाले. विशेष महत्व म्हणजे हे गुण बेस्ट ऑफ फाईव्ह व इतर गुणांशिवाय मिळवलेले गुण आहेत. तसेच निर्धार निवासींच्या विद्यार्थ्याने ९१% गुण मिळवले आहेत. यानंतर अभ्यासवर्गाला असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले; त्यापैके अमेय प्रकाश जाधव या विद्यार्थ्याने त्याच्या वर्गाच्या आठवणींना उजाळा दिला . मेहनतीशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होऊ शकत नाही असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
वर्गातील काही विशिष्ठ मुलांना प्रतिभाताई मोने व काणेमामा स्मृतीप्रित्यर्थ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

ख्यातनाम अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल देव कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कलेच्या क्षेत्रात अभिनयाखेरीज अनेक अन्य पर्याय उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रांकडे करीयरच्या दृष्टीने पाहावे असा सल्ला दिला.झी २४ तासचे मुख्य संपादक उदयजी निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांशी हार्ट टू हार्ट संवाद साधला.” आशावादी व निराशावादी बनण्यापेक्षा प्रयत्नवादी बना” असं मार्गदर्शन उदयजींनी केलेआपल्या देशाचा जसा अर्थसंकल्प मंडला जातो तसा ज्ञानसंकल्प मंडला जात नाही याची त्यांनी खंत व्यक्त केली. माहिती व ज्ञान या गोष्टीतील फरक त्यांनी समजून सांगितला. बुद्धिमत्तेपेक्षाही एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती महत्वाचा असतो याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
२० वर्षे चालत आलेल्या चतुरंगच्या ज्ञानसंकल्पाचे हे फलित आहे असे चतुरंग कार्यकर्ता रणजित काळे यांनी म्हटले. निवासी व निर्धार निवासी वर्गाच्या माध्यमातून कोकणातील विध्यार्थ्यांना दिशा दाखवण्याचे काम चतुरंग गेल्या २० वर्षे करत आहे. गौरव जरी निवडक विद्यार्थ्यांचा झाला असला तरी वर्गातील प्रत्येक विद्यार्थी गुणवंत आहे असे त्यांनी म्हटले. अशा प्रकारे ऋणनिर्देशाने या कार्यक्रमाची सांगता झाली

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?June 25, 2017
10.00 AM
ठिकाणब्राम्हण सहाय्यक संघाचे सभागृह, चिपळूण
पत्ताब्राम्हण सहाय्यक संघाचे सभागृह, चिपळूण
प्रमुख पाहुणेडॉ.उदय निरगुडकर सोबत सौ. मृणाल देव - कुलकर्णी आणि श्री.विनोद फणसे

फोटो गॅलरी