सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार – २०१९

पहाटेच्या साखरझोपेत असताना अचानक खिडकीतून सूर्य देवाचा संदेश घेऊन आलेली किरणं आपल्या डोळ्यांवर पडावी आणि आपल्या पापण्या अलगद उघडव्यात त्याचं पद्धतीने रंगमंचावरील पडद्याने आपले डोळे उघडले. जणू रंगमंचावर असलेली ती तेजस्वी किरणे त्या पडद्याला सहन झाली नसावीत! रंगमंचावर “चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार प्रदान सोहळा” या फलकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलच परंतु व्यासपीठावर असलेले प्रमुख पाहुणे व त्यामागील प्रेक्षकांनी भरलेला सभागृह पाहून थोडेसे घाबरलेले परंतु उत्साही चेहरे कोणत्याही सूर्यकिरणापेक्षा कमी नव्हते. ४९ शाळा तील एकूण १९९ विद्यार्थ्यांमधून निवडलेले ते विद्यार्थी पुरस्कारातील “सर्वोत्तम” या विशेषणाचे मूर्त रूप होते…
ठीक १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम हा शैक्षणिक क्षेत्रातील असल्यामुळे विद्येची देवता सरस्वतीचे स्मरण केल्याशिवाय कार्यक्रम सुरू करणे चतुरंग प्रथेला शोभणारे नव्हते. इशस्तवन गायनासाठी रंगमंचावरील विद्यार्थ्यांमध्ये असलेली विद्यार्थिनी कु. साक्षी कदम पुढे आली. ” शारदे पूर्ण कर कामना” अशा या कोमल स्वरांनी सभागृह सुगंधित झाला. रंगमंचावरील पाहुण्यांचे अत्तरकुपी व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ख्यातनाम अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माते श्री. अशोक समेळ यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभली त्याच बरोबर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी – सती – चिंचघरी येथील मुख्याध्यापक व शिक्षणक्षेत्रातील एक व्रतस्थ व्यक्ती श्री. विनोद फणसे सर देखील व्यासपीठावर उपस्थित होते. या रत्नांची निवड करण्याचं शिवधनुष्य पेललं ते एका चतुरंग बाह्य निवड समितीने. श्री धनंजय चितळे, मीना नातू व ठाकूरदेसाई सर हे या तिघांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या ग्रुप इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या मुलांची निवड करण्यात आली… निवड समितीच्या प्रतिनिधी म्हणून सौ. मीना नातू या उपस्थिती होता. या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
चतुरंग प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम आणि स्व. एस वाय गोडबोले सरांचा उल्लेख न करणे म्हणजे एखाद्या शुभकार्याच्या प्रारंभी गणेशाला न पुजण्यासारख आहे. १९८६ पासून चतुरंग प्रतिष्ठानच्या शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात झाली. स्व. गोडबोले सरांनी कायम चतुरंगच्या शैक्षणिक रथाचं सारथ्य केलं. कार्यक्रमाची प्रस्तावना करत असताना चतुरंग कार्यकर्त्या इंद्रायणी दीक्षित यांनी गोडबोले सरांच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वोत्तम विद्यार्थी तयार व्हावा या साठी कायम झटत असणाऱ्या गोडबोले सरांचा उपस्थितीत ” चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार” ही संकल्पना उदयास आली. या संकल्पनेचे हे एकोणिसावे वर्ष. लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचं सोन होतं पण परीस स्वतःचा गुणधर्म लोखंडाला दान करत नाही. तो लोखंडाला स्वतः सारखं बनवू शकत नाही; परंतु स्वतः सर्वोत्तम असणारे गोडबोले सर अनेक गोडबोले तयार व्हावेत अशी इच्छा बाळगत होते. शिक्षण क्षेत्रात बदल घडवायचा असेल तर विकासाचं सूत्र हे फक्त विद्यार्थी घटका पुरतं मर्यादित न ठेवता ते शिक्षक व पालक या घटकांनाही लागू व्हावं असं गोडबोले सरांचं मत होतं. त्यातूनच “शिक्षक प्रेरणा जागृती वर्गाची सुरुवात झाली. त्याचबरोबर पालक प्रबोधन ही तेवढंच आवश्यक असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.
पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत खरंतर चतुरंग बाह्य असलेल्या या निवडसमितीच्या सदस्यांच फार योगदान होतं. मुलाखतीसाठी आलेले सर्वच विद्यार्थी हे सर्वोत्तम होते आणि यातून एकाची निवड करणे म्हणजे अगदी कसरतच होती. निवडसमितीच्यावतीने उपस्थित असलेल्या मीना नातू यांनी त्यांचा मुलाखतीचा अनुभव सांगितला. एक काळ असा होता की सर्व विद्यार्थ्यांचा कल हा फक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्राकडे असायचा; परंतु आता असेल जाणवत नाही. आता विद्यार्थी सैन्यात जायची किंवा लेखक, चित्रकार , शिक्षक , अभिनेता व्हायची स्वप्ने बाळगत आहेत . ही गोष्ट सुखद करण्यासारखी आहे असे त्यांचे मत होते. विद्यार्थ्यांचं चालू घडामोडींच ज्ञान हे चांगलं आहे पण त्यावर स्वतंत्र विचार नाहीत या गोष्टींविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. माणूस हा स्वतःच्या विचाराने आणि ज्ञानाने समृद्ध होतो त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करा असा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना संदेश दिला. व्यासपीठावरील मान्यवर आणि स्वतः एक शिक्षणप्रेमी असलेले विनोद फणसे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गरुड आकाशातून झेप घेत असताना आपल्या पिल्लांना जमिनीवर टाकतो. तेव्हा त्या पिल्लांकडे दोन पर्याय असतात. एकतर शरण येतील खाली पडायचं किंवा आकाशात झेप घ्यायची. विद्यार्थ्यांनी दुसरा पर्याय निवडावा. कोलंबसने पृथ्वी प्रदक्षिणा करताना समुद्राला आव्हान केलं. त्याने समुद्राला म्हटलं ” तुला मर्यादा आहेत पण मला नाहीत”. अपयशातून खचू नये , निंदेला घाबरू नये आणि कायम इतरांना सर्वोत्तम बनवण्यासाठी कार्यशील रहा अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन श्री. फणसे सरांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रम पुढे सरकत होता व व्यासपीठावरील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अधिक उत्सुकता दिसत होती. विद्यार्थ्यांचा गौरव करत असताना त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे वाचन करण्यात आले. काहींना आय ए एस अधिकारी बनून देशाची सेवा करायची होती तर काहींना चित्रकार बनून आपल्या डोळ्यांतील जग कॅनव्हासवर उतरवायचे होते. काहिंसमोर डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांचा आदर्श होता तर काहीजणांसमोर त्यांच्या आईवडिलांचा! काहींना गायन , वादन व नृत्याचा छंद तर काहींना विज्ञानाचा. अशा विविध गुणांनी गुणवंत असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल चे गौरव शब्द सर्वांच्या कानी पडत होते. गौरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी नंदिनी खरबुडे , अमोघ वैद्य, तनुजा प्रभुदेसाई व आदित्य वडगावकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या शाळेतील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही चतुरंग ने निवासी व निर्धार वर्गातून मार्गदर्शन करावे असे नंदिनी खरबुडे हीचे मत होते. नाट्यवेडा असलेला अमोघ पुढील आयुष्यात त्याचा छंद जोपासण्यावर भर देणार असल्याचे त्याने सांगितले. अशा प्रकारच्या मुलाखतीची पहिलीच वेळ असली तरीही परीक्षकांनी आमच्यावर दडपण येऊ दिलं नाही असे तनुजा प्रभुदेसाई हिने सांगितले.
हे सर्व विद्यार्थी निवडताना फक्त “अभ्यास” हाच निकष लावण्यात आला नव्हता. अभ्यासाबरोबरच खेळ, कला, सामाजिक भान इत्यादी घटकांचाही यात विचार केला गेला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे अशोक समेळ हे ही एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. रुपारेल महाविद्यालयात असताना अशोक समेळ यांनी क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं. ५० हून अधिक नाटकाचं नाट्यलेखन करणाऱ्या समेळांनी दूरचित्रवाहिनी च्या २००० अधिक भागाचं लेखन केलं. अशाप्रकारच्या व्यक्तिमत्त्वाच मार्गदर्शन मिळणे हे व्यासपीठावरील व सभागृहातील सर्वांचेच भाग्य ! आई वडील पाल्यावर संस्कार करत असले तरीही त्याला शिक्षकच घडवतात. लक्ष्मीकांत बेर्डे व रघुनाथ माशेलकर यांचा सहवास लाभलेल्या समेळांनी यांनी त्यांच्या शाळेतील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. आपल्या गुणांची जोपासना करत असताना इतर कोणत्याही इतर गुणाकडे दुर्लक्ष होऊ न देणे फार महत्वाचे असते. नटसम्राट या नाटकातील काही संवाद त्यांच्या मुखातून ऐकायला मिळाले. कार्यक्रमाअंती चतुरंग कार्यकर्त्या सौ स्नेहल जोशी यांनी ऋणनिर्देशन केले. विविध अंगांनी नटलेल्या या सोहळ्याला कार्यकर्ते श्री रणजित काळे यांच्या सूत्रसंचालनाची जोड लागली.
या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक व गुरुजन आले होतेच ; परंतु इतर शिक्षणप्रेमी प्रेक्षकांची येथे उपस्थिती लाभली. विविध रत्नांनी नटलेला दागिन्यांचा हार जशी गळ्याची शोभा वाढवतो त्याच पद्धतीने रंगमंचावरील मान्यवर व विद्यार्थी यांनी रंगमंचाची शोभा वाढवली. युनायटेड हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याने स्व. गोडबोले सरांच्या या सर्वोत्तम विद्यार्थी घडवण्याच्या व्रताला जोड दिली आणि त्यांना एकप्रकारे “गुरुदक्षिणा”च दिली असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही…

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?January 13, 2019
9.00 AM
ठिकाणगुरुदक्षिणा सभागृह, चिपळूण
पत्तागुरुदक्षिणा सभागृह, चिपळूण
प्रमुख पाहुणेश्री. अशोक समेळ

फोटो गॅलरी