सवाई एकांकिकोत्सव २०२०

स्वर्गीय गणेश सोळंकींच्या पश्चात सुरु झालेली सवाई एकांकिका स्पर्धा गेली 33 वर्ष अखंड जल्लोषात आणि उत्साहात मुंबई येथे होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभराच्या कालावधीत होणाऱ्या विविध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतून प्रथम क्रमांक येणाऱ्या एकांकिकांची प्राथमिक फेरी होऊन, त्यातील 7 सर्वोत्तम एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड होते. ह्या एकांकिका अर्थातच असतात ‘Best Of State’ आणि ‘Best Of Year’. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला हा कार्यक्रम सुरु होतो आणि 26 जानेवारीच्या पहाटे वंदे मातरम आणि पारितोषिक वितरणाने संपन्न होतो. याच सवाई स्पर्धेचा आनंद पुणेकर रसिकांना मिळावा म्हणून सूरू केलेला सवाई एकांकीकोत्सव 3 किंवा 4 निवडक एकांकिकांसह भरत नाट्यमंदिरात संपन्न होतो.
सवाई एकांकीकोत्सवाच्या ह्या चौथ्या वर्षी ‘ब्रम्हास्त्र’, ‘द कट ‘आणि ‘द बास्टर्ड पेट्रीऑट’ ह्या एकांकिका सादर झाल्या. या वर्षी समाजातील विविध विषयावर भाष्य करणाऱ्या पण तितक्याच नाविण्यपूर्ण एकांकिका रसिकांना पहायला मिळाल्या. दशावतार ही कोकणातील लोप पावत चाललेली कला.या कलेला उर्जिता अवस्था आणण्यासाठी दशावतारातील अनेक भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या अभिनेत्याला त्याच्याच घरातील लोकांबरोबर कराव्या लागणाऱ्या संघर्षावर भाष्य करणारी ‘ ब्रम्हास्त्र ‘ ही एकांकिका महर्षी दयानंद महाविद्यालयाने सादर केली. त्याचबरोबर वलय नाट्यसंस्था पुणेने सादर केलेली ‘ द कट ‘ ही एकांकिका आफ्रिकन देशांमध्ये विशेषतः सोमालिया या देशामध्ये चालू असलेल्या Female genital mutilation(FGM)या प्रथेबद्दल अत्यंत प्रभावीपणे भाष्य करणारी होती.
यंदाची सवाई एकांकिका ठरलेली दिशा थिएटर्स आणि ओमकार प्रॉडक्शन कल्याणची ‘अ बास्टर्ड पेट्रीऑटने ‘ महायुद्धाच्या वेळी हिटलरच्या काळातील जर्मनीचे वास्तव उभे केले.फ्रील्झ हेबर या धर्माने ज्यू असणाऱ्या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनामुळे लाखो ज्यू लोकांना मारले गेले. आणि हा शास्त्रज्ञ निव्वळ एक मुर्ख राष्ट्रभक्त कसा ठरला याचे सादरीकरण थक्क करणारे होते. यावर्षी एकांकीकोत्सवला अनेक मान्यवर चतुरंग प्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावली. जेष्ठ मूर्तीतज्ञ श्री देगलूरकर सर, जेष्ठ गायिका अभिनेत्री निर्मलाताई गोगटे, जेष्ठ लेखिका वीणा देव, सामाजिक कार्यकर्ते श्री गिरीश प्रभुणे,FTII चे दिग्दर्शन विभाग प्रमुख श्री मिलिंद दामले सर, MKCL चे श्री उदय पंचपोर, श्री केतन गोखले, श्री भाई पाठक, स्मृतिगंधचे श्री अमित टिल्लू, श्री सरपोतदार या व अशा अनेक दिग्गजांनी एकांकीकोत्सवला मनापासून दाद दिली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?February 22, 2020
5.30 PM
ठिकाणभरत नाट्यमंदिर , पुणे
पत्ताभरत नाट्यमंदिर , पुणे

फोटो गॅलरी