दिवाळी पहाट २०१७ – चिपळूण

मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे मराठी रंगभूमीला लाभलेलं वरदान. त्याच्या अफलातून आवाजाने आणि मधुर स्वरांनी त्यांनी रंगभूमीची सेवा केली. या त्यांच्या पहाडी आवाजाचे स्मरण देत स्वरविलासाने विस्मयचकित करणारी अभंग-नाट्यसंगीताची मैफल ब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण या सभागृहात १९ ऑक्टो. रोजी पहाटे ६ वाजता पार पडली. निमित्त होतं ते चतुरंग प्रतिष्ठान आयोजित दिवाळी पहाट मैफिलीचं. या कार्यक्रमाचे कलाकार होते ‘स्वराधीश भरत बळवल्ली.
जेष्ठ तबला वादक मोहन बळवल्ली आणि गायिका ज्योती बळवल्ली यांचे सुपुत्र भरत बळवल्ली यांनी त्यांच्या सांगीतिक घराण्याचा वारसा जपला आहे. पं. तुलसीदास बोरकर व पं. यशवंतबुवा जोशी यांच्याकडे यांनी संगीताचे शिक्षण घेतले. करवीर पिठाचे शंकराचार्य यांनी भरत बळवल्ली यांना ‘स्वराधीश’ हि पदवी बहाल केली. बळवल्ली यांचे अनेक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. अशा सुप्रसिद्ध गायकाची मेजवानी पहाटेच्या रम्य वातावरणात चिपळूणकरांना मिळाली.
गेली ३२ वर्षे सामाजिक जाणीव जपत चतुरंग प्रतिष्ठान दिवाळी पहाटच्या निमित्ताने रसिकांना विविध कलाकारांच्या माध्यमातून स्वरमेजवानी देत आहे. कंदील-पणत्यांनी सजवलेला परिसर, सुवासित स्वागत, फराळ आणि एका सामाजिक संस्थेला भाऊबीज भेट इत्यादी उपक्रम या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. यावेळी भर पडली ती वासुदेवाच्या मंजुळ वाणीची. कार्यक्रम सुरु होण्याच्या अगोदर वासुदेवाच्या सुरांनी मैफिलीसाठी वातावरण निर्मिती केली. मास्टर दीनानाथांच्या नाट्यसंगीतातील विविध रागांचे श्रवण चिपळूणकरांना झाले. या मैफिलीला साई बँकर यांनी तबल्याने व भाऊ परब व मकरंद कुंडले यांनी पखवाज व हार्मोनियमने साथ दिली. मंगला खाडिलकर यांच्या निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आणली. त्यांनी कार्यक्रमादरम्यान विविध आठवणींना उजाळा दिला.
सावरकरांच्या हिंदी मराठी कवितांवर भरत बळवल्लींचा “स्वतंत्र्ये भगवती” हा अल्बम काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते प्रसिद्ध झाला. या अल्बममधील काही पद बळवल्लीनी सादर केली. “हरी म्हणा” या बळवल्लींच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या गाण्याला प्रेक्षकांनी उभं राहून दाद दिली. संपूर्ण परिसर भरत बळवल्लींचा स्वरांनी माखून गेला. ऋणनिर्देशाने कार्यक्रमाचा शेवट झाला. निरोप घेताना रसिकांना फराळाची मेजवानी चतुरंग कडून मिळाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?October 19, 2017
6.00 AM
ठिकाणब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण
पत्ताब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण
प्रमुख पाहुणेस्वराधीश भरत बळवल्ली

फोटो गॅलरी