चतुरंग रंगसंमेलन – देखण्या पावलांचा सन्मान

यावर्षीचा सांस्कृतिक क्षेत्रीय चतुरंग जीवनगौरव पुरस्कार छत्रपति शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे निवृत्त संचालक श्री. सदाशिव गोरक्षकर यांना घोषित झाला. अर्थात रंगसंमेलनात काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असणारच अशी अपेक्षा असणाऱ्या रसिकांची अपेक्षापूर्ती चतुरंग प्रतिष्ठानच्या २६व्या रंगसंमेलनाने केली.
रविवार दि. १८ डिसेंबर रोजी डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात दुपारी दीडपासून पदार्पण करणाऱ्या प्रेक्षकांना पहिला सुखद धक्का होता, तो कलामंदिर प्रांगणात उभ्या केलेल्या म्युझियम परिसर देखाव्याचा. एरवी प्रेक्षागृहात प्रवेश करण्यास उत्सुक असलेली पावले आधी रेंगाळत होती ती ‘म्युझियम प्रांगणात’. प्रत्येकाने केव्हाना केव्हा आपल्या लहानपणी म्युझियम बघितलेले असणारच. नकळत प्रत्येक मन गतस्मृतीत डोकावून आले आणि चहापानासाठी इथेच निवांत यायचेय या विचाराने प्रेक्षागृह प्रवेशासाठी वळले.
आणखी एक सुखद धक्का इथेही होता. प्रेक्षागृहाचे काचेचे दार रसिक स्वागतासाठी उघडले गेले आणि समोर दर्शन झाले ‘नटराजां’चे. एरवी नटराजपूजन म्हणजे व्यासपीठावर एखाद्या मान्यवराच्या हस्ते पूजन. इथे मात्र तो मान दिला होता चक्क रसिकप्रेक्षकांनाच. प्रेक्षकांमधे रंगसंमेलनासाठी आवर्जून उपस्थित श्रीमान दाजीशास्त्री पणशीकर यांना प्रथम रसिकाचा मान मिळाला. त्यांच्या हस्ते नटराजपूजन झाले. पाठोपाठ अन्यही रसिकांना पुष्पांजली वाहून नटराज पूजन करण्याचे आवाहन चतुरंग कार्यकर्त्यांनी केले.
प्रेक्षक आसनस्थ होताहेत तोच ठीक २ वाजून ५ मिनिटांनी चतुरंग प्रतिष्ठानच्या २६व्या रंगसंमेलनास प्रारंभ झाला. हा प्रारंभ होता तो ‘देवतीर्थ’ मैफलीचा. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित व आजचे आघाडीचे शास्त्रीय संगीत गायक जयतीर्थ मेवुंडी यांच्या उपशास्त्रीय, संमिश्र जोड मैफलीचा आनंद रसिकांनी घेतला. ‘राम का गुनगान करीए’, ‘राजस सुकुमार’, ‘अकार ऊकार मकार करीती हा विचार’, ‘सूर चराचर छायो’, ‘मै तो सावरे रंग रायी’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’….. या रचना सादर झाल्या. या मैफलीत तबला व हार्मोनियम साथ विश्वनाथ व सीमा शिरोडकर यांनी केली तर तालवाद्यांमधे गंधार जोग व व्यंकटेश कुलकर्णी यांनी सहभाग दिला.
नंतरच्या ‘द म्युझियम’ या बॅलेबद्दल प्रत्येकाच्याच मनात खूप मोठी उत्सुकता होती. ‘देवतीर्थ’ पाठोपाठ काही क्षणांतच नृत्यगुरु, नृत्यांगना सौ. सोनिया परचुरे यांच्या सुमारे चाळीसेक नृत्यकलाकारांनी रंगमंच व्यापला आणि आता पुढचे सादरीकरण नेमके कसे असेल या विचारात पुढचा सव्वा तास कसा संपला कळलेच नाही.
वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ श्री. सदाशिव गोरक्षकर यांना अभिवादन म्हणून सोनियाजींनी मोजक्या दिवसात प्रचंड मेहनतीने ‘द म्युझियम’ची निर्मिती केली होती.
स्वतः सदाशिव गोरक्षकर त्यांच्या तरुणपणी या म्युझियममधून फिरताना, संग्रहालय अभ्यासताना, त्यांची एकाग्रता, तादात्म्यता जणू त्या वस्तूंनाच त्यांच्याशी बोलतं करते. त्या वस्तूंमधला इतिहास-त्यांच्या भोवतीच्या कथा सगूण साकार होऊन संवाद करू लागतात, अशी विलक्षण संकल्पना या नृत्यनाट्यात-बॅलेत होती. त्यातील विशेष लक्षणीय बाब म्हणजे सर्व कलाकारांची विषयाला पूरक अशी वेशभूषा. त्यातील वस्त्र आणि दागिन्यांची निर्मिती ही स्वतः सोनियाजींच्या कल्पनेतून साकारली होती. सहकार्यांच्या मदतीने निर्माण करण्यात आली होती.
‘द म्युझियम’ या बॅलेच्या लिखाणासाठी त्यांना संपदा कुलकर्णी यांचा तर दृक-श्राव्य माध्यमासाठी चंद्रकांत कुलकर्णी आणि अन्यही मंडळींचा सहभाग लाभला होता. ‘द म्युझियम’च्या निर्मितीतून एक अत्यंत नावीन्यपूर्ण संकल्पना रंगसंमेलन मंचावर साकार झाली.
आता वेळ होती ती चहापानाची. त्यासाठी उपस्थित तमाम रसिकांना प्रेक्षागृहाबाहेर उभ्या केलेल्या म्युझियम प्रांगणात पाचारण करण्यात आले. खानपान-चहापानाचा आस्वाद घेता घेता प्रेक्षकांना भेटता-बोलता आले ते, रंगसंमेलन सोहÈयासाठी उपस्थित केंद्रीय मंत्री श्री. प्रकाशजी जावडेकरांसह अन्य अनेक मान्यवरांशी. सोबत कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त, उपायुक्त, महापौर ही मंडळीही चहापानात सामील झाली. तितक्यात रसिकांचे लक्ष गेले ते ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या कलाकारांकडे. मग त्यातल्या माधव-निलीमा, दत्ताभाऊ-सरिता, छाया-पूर्वा, नाथा…. अशा सार्यांना भेटून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यात सार्यांचीच अहमहमीका लागली. तर काही जूनी जाणती मंडळी नाटककार सुरेश खरे, दाजी पणशीकर, वसंतराव आजगांवकर या बुजुर्गांशी गप्पा मारण्यात दंग झाली. राजकारण-समाजकारणाची आवड असणार्यांनी डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. उदय निरगूडकर यांना गाठले तर साहित्यरुची असणार्यांना डॉ. गो. बं. देगलूरकर, मृदुला प्रभुराम जोशी, धनश्री लेले यांची भेट हवीशी वाटली. शिवाय नंतरच्या ‘आपली आवड’ कार्यक्रमाचे कलाकार श्रीधर फडके, रवीन्द्र साठे, उर्मिला धनगर, शिल्पा पुणतांबेकर यांना वेढा पडला तो संगीतप्रेमींचा….. या सार्या गप्पागोष्टी सुरु असतानाच छोटेखानी व्यासपीठावरुन स्मरणिका प्रकाशनाची घोषणा झाली आणि सार्यांच्या नजरा तिकडे वळल्या. पहिल्या काही मिनिटात डॉ. उदय निरगुडकर यांनी यावर्षीच्या चतुरंग स्मरणिका युक्त दैनंदिनीच्या स्वरुपाची, त्यातील लेखांची कल्पना दिली. स्मरणिकेचे प्रकाशन होणार असे जाहीर तर करण्यात आले. पण व्यासपीठाजवळ काहीच तयारी कशी नाही या संभ्रमात पडलेल्या रसिकांचे चित्त वेधून घेतले ते अगदी थोड्याच वेळापूर्वी ‘द म्युझियम’मधे ‘पुतळा’ साकारणारा एक नृत्य कलाकार अनोखा पदन्यास करीत पुढे आला त्याच्याकडे. प्रेक्षागृहात मांडलेल्या शिलालेखातून स्मरणिका घेऊन तो पदन्यास करीतच व्यासपीठापर्यंत पोहोचला आणि डॉ. निरगुडकरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन झाले.
म्युझियमच्या पार्श्वभूमीवर म्युझियमचे मुखपृष्ठ असलेली आणि वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ श्री. सदाशिव गोरक्षकरांचा गौरवग्रंथ असणारी स्मरणिका घेण्यासाठी रसिकांची पावले मग स्मरणिका काऊंटरकडे वळली.
यानंतर रंगसंमेलन व्यासपीठ तयार होते ते यावर्षीच्या श्री. सदाशिव गोरक्षकर यांच्या जीवनगौरव पुरस्कार प्रदानासाठी. यंदाच्या जीवनगौरव पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ . विनय सहस्रबुद्धे, श्री. सुधीर जोगळेकर आणि डॉ . उदय निरगुडकर या समिती सदस्यांसह उपस्थित होते. समितीतील अन्य सदस्य श्री. विजय कुवळेकर, डॉ. नीला सत्यनारायण, नामदेव कांबळे आणि श्री. सुधीर गाडगीळ आपल्या पूर्वनियोजित कामांमुळे अथवा प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. कल्याण-डोंबिवलीचे प्रथम नागरिक महापौर श्री. राजेंद्र देवळेकर यांनी श्री. बाबूजी गोरक्षकर, श्री. प्रकाश जावडेकर आणि डॉ . गो.बं. देगलूरकर यांचे पुष्प आणि अत्तरकुपी देऊन स्वागत केले. तर डोंबिवलीतील रसिकाग्रणी सौ. सुधाताई म्हैसकर यांनी निवड समितीच्या सुयोग्य निवडीबद्दल समिती सदस्यांचे अभिनंदन करून त्यांचेही स्वागत केले.
समारंभाचा प्रारंभ झी२४ तासच्या टीमने खास सदाशिवराव गोरक्षकरांवर अलिकडेच केलेल्या ध्वनिचित्रफित दर्शनाने झाला. पाठोपाठ झालेले निवड समिती अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे भाषण यावर्षीच्या सांस्कृतिक पुरस्कारासाठी सदाशिवराव गोरक्षकरांचे नाव किती सुयोग्य आहे या मुद्यांना अधोरेखित करणारे ठरले.
गौरवशब्दांसाठी पाचारण करण्यात आले ते मंदिरस्थापत्यशास्त्राचे अभ्यासक उत्तम वक्ते डॉ. गो. बं. देगलूरकर यांना. आपल्या समयोचित आणि खुसखुशीत शब्दांनी त्यांनी बाबूजी गोरक्षकरांच्या कार्याचे महत्व सांगतानाच आपल्या शब्दांनी रसिकांना अंतर्मुखही केले.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सदाशिवराव गोरक्षकर यांचा तीन लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पाठोपाठ बाबूजींना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी साथ देणार्या पत्नी सौ. गीताताई यांचाही डोंबिवलीतील चतुरंगप्रेमी सौ. अंजली चक्रदेव यांच्या हस्ते सौभाग्यवाण देऊन सन्मान करण्यात आला. श्री. व सौ. गोरक्षकरांच्या लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाबद्दल उभयतांना शुभेच्छाही देण्यात आल्या.
आता वेळ होती ती सत्कारमूर्तींचे मनोगत ऐकण्याची. बाबूजी गोरक्षकरांनी आपल्या जीवनप्रवासात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले अशा सर्वांचा आवर्जून उल्लेख केला. मनातली एक खंतही त्यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले, म्युझियम या शास्त्राकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. हे खरं म्हणजे शिक्षणाचं उत्तम माध्यम होऊ शकतं. तसं पाहिलं तर प्रत्येक गावात म्युझियम होऊ शकतं आणि त्याचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे.
समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री. प्रकाश जावडेकर (केंद्रीय मंत्री, मानव संसाधन विकास खाते) यांनी आपल्या भाषणातून श्री. सदाशिव गोरक्षकर यांच्या कार्याला अभिवादन करतानाच, ‘म्युझियम’ या विषयाला परदेशांतून असलेले महत्व कथन केले. आपल्या देशात दीर्घकाळ या विषयाकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. पण आता काळ बदलतोय. बदलत्या काळात आपल्या देशात शैक्षणिक प्रगती संदर्भाने म्युझियम निर्मिती होऊ शकते हे सांगताना नालंदा, तक्षशीला यांच्या प्राचीन काळातील विद्यापिठांचा संदर्भही दिला. या जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अत्यंत नेटके सूत्रसंचालन सौ. मुग्धा गोडबोले यांनी केले होते.
मध्यंतरानंतर कार्यक्रमाची सांगता झाली ती ‘आपली आवड’ या संगीत कार्यक्रमाने. या सुगम संगीत मैफलीत रवींद्र साठे, श्रीधर फडके, उर्मिला धनगर, शिल्पा पुणतांबेकर यांच्या गायनाचा आनंद लाभला. ‘कुणाच्या खांद्यावर’, ‘आम्ही ठाकर’, ‘सर्वांगे सुंदरू’, ‘सख्या रे घायाळ मी’, ‘देव देव्हार्यात नाही’, ‘कानडा राजा’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘आकाशी झेप घे रे’, ‘ताने स्वर रंगवावा’, ‘संगीत मनमोहीरे’, ‘असेल कोठे रुतला काटा’, ‘अरे कृष्णा अरे कान्हा’, ‘जीव देवानं धाडला’, ‘पिकल्या पानाचा’…. आणि अगदी हटके अशा ‘दमादम मस्त कलंदर’… या गीतांनी हा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाचे निवेदन धनश्री लेले यांचे, तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे होते.
रंगसंमेलन रंगमंचाच्या पडद्यावरची सजावटही चतुरंग कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून साकारली होती. जणू म्युझियमच्या एका दालनातच हा सोहळा साकार होतो आहे असा भास निर्माण करण्यात आला होता. त्यात पडद्यावर पूर्णवेळ दृष्टीस पडणारी कविवर्य बा. भ. बोरकरांची ‘देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…’ ही काव्यपंक्ती पुनःपुन्हा रसिकमनांना अंतर्मुख करत होती. श्रीमान बाबूजी गोरक्षकरांनी वस्तूसंग्रहालयशास्त्राचा, ते जतन करण्याचा जो ध्यास घेतला तो आयुष्यभर तर उराशी जपलाच पण आजही वयाची ८० पार केल्यावरही त्यांची पाऊले त्या ध्यासाने कार्यरत आहेत. ‘त्या देखण्या पावलांचा’ मनोमन सन्मान करत रसिकांनी रंगसंमेलन २०१६ सोहळ्याचा तृप्त समाधानी मनाने निरोप घेतला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?December 18, 2016
2.00 PM
ठिकाणसावित्रीबाई फुले नाट्यगृह ,डोंबिवली
पत्तासावित्रीबाई फुले नाट्यगृह ,डोंबिवली
प्रमुख पाहुणे. प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. उदय निरगुडकर, डॉ. नीला सत्यनारायण , सर्वश्री विजय कुवळेकर, सुधीर गाडगीळ, सुधीर जोगळेकर, नामदेव कांबळे, मुग्धा गोडबोले, सौ. सोनिया परचुरे, देवकी पंडित, जयतीर्थ मेवुंडी, विश्वनाथ शिरोडकर, सीमा शिरोडकर, गंधार जोग, श्रीधर फडके, रवींद्र साठे, उर्मिला धनगर-मोरे, धनश्री लेले

फोटो गॅलरी