चतुरंग म्हणजे…

अभिमानपूर्वक नमस्कार !

‘चतुरंग म्हणजे काय ?’ असं कुणी विचारलं तर नेमकं काय सांगायचं, असा प्रश्न केवळ इतरांना नव्हे तर कधी कधी खुद्द चतुरंगलाही पडतो. स्पष्टपणे एक जाणवतं कि ‘चतुरंग’ हे संस्थेचं नाव नसून एका वृत्तीचं नाव आहे. मग काय आहे ही चतुरंग वृत्ती ? तर सर्वांनी सातत्याने, नियमितपणे एकत्र यावं. चांगल्या गोष्टीचा एकत्रितपणे आस्वाद घ्यावा. कलानंद घ्यावा. आपणच घ्यावा असे नव्हे तर इतरांनाही त्यात सहभागी करून घ्यावं. जगात जे जे काही उत्तम, उदात्त आहे, त्याचा सन्मान करीत ते जगासमोर ठेवत जावं आणि दुसरीकडे आपण आंतरिक समृद्ध होत जावं ! आपला सभोवतालही समृद्ध करण्याचा नेटाने प्रयत्न करीत राहावा. तर अशी साधी सरळ सोपी विचारसरणी जपत-जोपासत चतुरंगचा पसारा मुंबई-डोंबिवली-पुणे-चिपळूण करीत गोव्यापर्यंत पसरलाय ! कार्यकर्ते चाराचे चाळीस ,चाळीस चे एकशे चाळीस … असे वाढत राहिलेत. चतुरंग विचार पटलेले टिकले , न पटलेले दूर गेले … पण संख्यात्मक आणि गुणात्मक संस्था-आलेख चढताच राहिला. चतुरंगचे कार्य आणि विचारसरणी पटणारी काही उद्योगपती, कलावंत, विचारवंत, साहित्यिक मंडळी ही संस्थेची हितचिंतक, मार्गदर्शक, सल्लागार आणि सहकारी या विविध भूमिकांतून संस्थेला लाभत राहिली आणि ‘असे सारेजण’ हेच चतुरंगचे बलस्थान ठरले.
        चतुरंगने गेल्या ४२ वर्षात विविध ५८ उपक्रमांद्वारे सुमारे १५०० कार्यक्रम साकार केले आहेत. त्यासाठी वापरलेल्या स्थळ-ठिकाणांची संख्या १९० च्या पुढे आहे, तर चतुरंग व्यासपीठावर-मंचावर प्रत्यक्षात सहभागी झालेल्या कलाकार-मान्यवरांची संख्या ९०० हून जास्त आहे. आता या ५८ पैकी ३० उपक्रम पूर्वनियोजनानुसार योग्य टप्प्यावर थांबवले गेले, तर २८ उपक्रम आज सुरु आहेत. प्रतिवर्षी होणाऱ्या सुमारे ४०-४५ events नी चतुरंगचे उपक्रमचक्र वर्षभर गतिमान असते.
        आजवरच्या ५८ चतुरंगी उपक्रमांची वर्षनिहाय, संख्यात्मक माहिती देण्यासाठी चतुरंग दफ्तरातील कागदपत्रीय दस्तावेजातून काही तपशिल संकलित करण्याचा येथे प्रयत्न केला आहे. त्यामधून नेमकं काम काय आणि किती झालंय ते आकडेवारीनिशी कळेल आणि त्यामागच्या चतुरंग वृत्तीचाही परिचय होईल.
        चतुरंगच्या सातत्यपूर्ण वाटचालीत कल्पकता,नेटके आयोजन आणि शिस्त या तीन गोष्टींचा वाटा अत्यंत महत्वाचा राहिला आहे. अर्थात याचं श्रेय चतुरंगचे मास्तर – स्व. गणेश सोळंकी – यांनाच द्यावे लागेल. सुरुवातीलाच ते कानमंत्र देऊन गेले : सतत नावीन्याची कास धरा. मळलेल्या वाटेने जाऊ नका. स्वतःची पायवाट स्वत:च तयार करा. त्याचा हमरस्ता झालाच तर तो इतरांकडून होऊ द्या ! आज अनेक ठिकाणी अनेकांकडून साजऱ्या होणाऱ्या दिवाळी पहाट, कलाकारांच्या मुलाखतींचे वा कलावंत दरबारासारखे कार्यक्रम, कलावंतांच्यासह होणाऱ्या वर्षासहली अथवा चतुरंगच्या जीवनगौरव पुरस्काराचे अनुकरण म्हणजे चतुरंगच्या पायवाटेचा हमरस्ता झाल्याचे म्हणावे लागेल.
        संस्थेचे कार्यकर्ते शिस्तीचा धडा स्वतःपासून गिरवतात. संस्थेच्या सशुल्क कार्यक्रमाचा मोफत पास घेत नाहीत. निष्चित केलेला गणवेषही स्वतःच्या खर्चाने शिवतात. समानतेचे तत्व पाळणाऱ्या चतुरंगमध्ये कुणालाही कोणत्याही प्रकारची बिरुदावली नाही. कार्यातून मिळणाऱ्या समाधानामुळे कार्यकर्ते संस्थेकडे आकृष्ट होतात!असे कार्यकर्ते हेच चतुरंगचे फार मोठे संचित आहे. चतुरंगच्या वाटचालीत सातत्य ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची ठरली आहे. ४२ वर्षातला वैविध्यपूर्ण उपक्रमांचा प्रवास अ-खंडित आहे.
        चतुरंग ही सरकारी दरबारी नोंदणीकृत संस्था आहे. विश्वस्थ संस्थेच्या कारभाराची काळजी वाहतात. ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या पूर्ण क्षमतेने संस्थेला प्रगतीपथाकडे नेत असतात. नियमित, उत्साही आणि उत्सवी अशा सर्व प्रकारचे कार्यकर्ते आपापल्या आवडी व क्षमतेनुसार त्यात मोलाची भर घालीत असतात. साकारणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर प्रथम सर्वांमध्ये चर्चा होते. त्याचे नियोजन केले जाते आणि कार्यक्रमोत्तर सिंहावलोकनही केले जाते. कौतुकाचा आणि तृटींचा ताळेबंद मांडला जातो. झालेलं कौतुक विस्मरणात टाकून चुकांची मात्र काळजीपूर्वक दखल घेतली जाते. मिळालेलं यश हा अपघात मानून अधिक यशासाठी प्रयत्नांचा अट्टाहास चालू राहतो.
        संस्थेने जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या अशा कार्यपद्धतीमुळे कविवर्य कुसुमाग्रजांच्या शब्दात, चतुरंग संस्थेचे ‘संस्थान’ झालेले नाही आणि खुर्च्यांची ‘सिंहासने’ झालेली नाहीत. संस्था आजही उत्तमरित्या कार्यरत आहे. प्रगतीपथावर आहे. चतुरंगाच्या कसदार बीजातून अंकुरलेल्या ‘चतुरंग वृत्ती ‘ चा हा विजय आहे. आज चतुरंगचे ‘चतुरंग प्रतिष्ठान’ जराशा मोठ्या झाडात रूपांतर झालाय. चतुरंगला वृक्षाकडे-वटवृक्षाकडे वाटचाल करायची आहे !! तूर्तास आजघडीला झालेल्या वाटचालीवरचा हा एक दृष्टीक्षेप ! ‘चतुरंग’ म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी !! जाणून घेणाऱ्यांसाठी !!!


…… चतुरंग प्रतिष्ठान परिवार

दि. ३ जुलै २०१६
रवींद्र नाट्यमंदिर -मुंबई