चैत्रपालवी – गोवा

‘चैत्रपालवी’च्या रंगतदार मैफिली रंगल्या
‘चतुरंग प्रतिष्ठान’ गोवातर्फे आयोजन, पं. मक्तेदार यांच्याहस्ते उद्घाटन •
चतुरंग प्रतिष्ठान गोवा केंद्रातर्फे गोव्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या चैत्रापालवी संगीत उत्सवाच्या सुर-तालाच्या संगीतमय कार्यक्रमात गोमंतकीय कलाकारांच्या सुरेख मैफिली रंगल्या. ढवळी येथील इंदिराबाई ढवळीकर हायस्कूलच्या भिडे सभागृहात नुकताच हा कार्यक्रम झाला.
गोवा संगीत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पं. शशांक मक्तेदार यांच्याहस्ते देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, श्रीफळ ठेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शशांक मक्तेदार म्हणाले, संगीतामध्ये ‘रियाज’ हा महत्वाचा आहे. पं. जितेंद्र अभिषेकी सांगायचे की रियाज हे प्रत्येक कलाकारासाठी ‘व्यसन’ बनले पाहिजे. युवा कलाकारांसाठी ‘चतुरंग’ने सुरु केलेला हा उपक्रम गोव्यातील संगीत क्षेत्रासाठी खूपच आशादायी आहे.
चतुरंगसारख्या संस्थांमुळे संगीत क्षेत्राला चांगले भवितव्य आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी विद्याधर निमकर यांनी चतुरंगतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. योगीता रायकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना हार्मोनियमवर सुभाष फातर्पेकर यांनी तर तुळशीदास नावेलकर यांनी तबल्यावर साथसंगत केली. प्रसिद्ध गोमंतकीय गायिका प्रचला आमोणकर यांची गायनाची मैफल व चारुदत्त गांवस यांचे हार्मोनियम वादन झाले.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?April 23, 2017
4.00 PM
ठिकाणभिडे सभागृह, ढवळी
पत्ताभिडे सभागृह, ढवळी
प्रमुख पाहुणेप्राचार्य पं. शशांक मक्तेदार, गायिका प्रचला आमोणकर, गायिका योगीता रायकर, हार्मोनियम : सुभाष फातर्पेकर,चारुदत्त गांवस, तबला : तुळशीदास नावेलकर

फोटो गॅलरी