आस्वादयात्रा

नाटय-नृत्य-संगीत-साहित्य-चित्रपट-यासारख्या सादरीकरणाच्या कलांचे, त्यांतील दिग्गज, मातब्बरांचे कार्यक्रम मुंबई-डोंबिवलीत भरपूर होत होते. पण चिपळूण केंद्र सुरू होऊनही तिथल्या केंद्रावर ते करणे, `अंतर' आणि `खर्च' यामुळे कांहीसे अवघड बनून राहिले होते. यावर वर्षभरात एखादी बहुरंगी कार्यक्रम मालिका चिपळूणकर रसिकांना अत्यल्प शुल्कामधे, सभासदत्व पद्धतीने देता येईल का, या चर्चा-विचारावर `आस्वादयात्रा' हे सुरेख सोल्यूशन चिपळूण केंद्राला सापडले. ज्यांचे येणे कोकणरसिकाला अप्रूपाचे, पर्यायाने आनंदाचे वाटेल अशा कलाकारांचे विविध स्वरूपाचे कलाविष्कारांचे कार्यक्रम या योजनेद्वारा चिपळूणमधे आयोजित करायचे ठरले. सुमारे तीन-चारशे रूपयांच्या वार्षिक शुल्कात पांच-सहा वेगवेगळे कार्यक्रम देणे, त्यातही एक भोजनासहित कौटुंबिक मेळावा स्वरूपातला असणे अशी कांहीशी त्यांची योजना ठेवली होती. खूप जल्लोषपूर्ण उत्साहात आणि हुकमी प्रतिसादात ही आस्वादयात्रा रंगतदार होत राहिली. यानिमित्ताने चिपळूणसारख्या कोकणभागात चतुरंगमुळे अनेक मान्यवर-मातब्बर कलावंतांचे येणे घडले, ही संस्थेसाठी अभिमानाची आनंदाची बाब वाटते.