नाशिक : २९वे चतुरंग रंगसंमेलन

Karyakram Page (1)

कार्यक्रमाची माहिती:

कधी आहे ?December 21, 2019
4.00 PM
ठिकाणमहाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
पत्तामहाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक

सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र असा ठसा उमटविणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानचे, ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदानार्थ योजले जाणारे ‘रंगसंमेलन’ यावर्षी प्रथमच नाशिक येथे होत असून, चतुरंगने नाशिककर रसिकांना ‘अष्टरंगी’ कार्यक्रम रचनेचा श्रीमंत नजराणा भेट देऊ केलाय्‌. सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी असलेला यंदाचा २९वा जीवनगौरव पुरस्कार, ‘तीन तलाक’ प्रथेविरुद्ध प्रदीर्घ काळ लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीमान्‌ सय्यदभाई (पुणे) यांना या रंगसंमेलनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. शनिवार-रविवार दि. २१-२२ डिसेंबर २०१९ या दोन दिवसांत दुपारी ४ ते १०.३० या वेळेत, महाकवी कालिदास कलामंदिर-नाशिक येथे त्यांच्या सन्मानार्थ योजलेल्या या रंगसंमेलनात साहित्य-नृत्य-नाट्य-चित्र-संगीत इ. क्षेत्रातील मातब्बर कलावंतांचे ६ विविधरंगी कार्यक्रम आणि २ भव्योदात्त समारंभ-सोहोळे असा भरगच्च ऐवज असणार आहे.
नाशिक म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकर आणि तात्यासाहेब म्हणजे नाशिक हे प्रस्थापित समीकरण विस्मरणात जाईल असा एकही नाशिककर सापडणार नाही. नाशिककरांच्या या भावनेची कदर म्हणून, स्व. शिरवाडकरांना विनम्र स्मरणांजली म्हणून आणि रंगसंमेलनातला ‘नाट्यरंग’ म्हणून ‘हा सूर्य…… हाच चंद्र!!’ ह्या शीर्षकाच्या अनोख्या नाट्यरुप कार्यक्रमाने रंगसंमेलनाचा प्रारंभ होईल. तात्यासाहेबांच्या एकाच देहात असलेली ‘नाटककार शिरवाडकर’ आणि ‘कविवर्य कुसुमाग्रज’ ही दोन रूपे, एकमेकांना समोरासमोर प्रत्यक्षात भेटली, तर ते दोघे काय बोलतील? त्यांच्यात कसा संवाद घडेल? अशी नाट्यमय, उत्कंठावर्धक मांडणी असणाऱ्या या नाट्यकार्यक्रमाचं लेखन सौ. धनश्री लेले यांचं आहे, तर दिग्दर्शन सध्याचा लोकप्रिय तरुण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याचे असणार आहे. तुषार दळवी आणि दीपक करंजीकर हे दोन कसलेले अभिनेते हा नाट्यप्रवेश सादर करतील. ‘वाद्यरंग’ साकारताना एखाद्याच वादक कलाकाराची वादन-मैफल घडवण्याऐवजी पं. रोणू मजुमदार (बांसरी), पं. भवानी शंकर (पखावज), आदित्य कल्याणपूर (तबला) या तीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंताची ‘नादवैभव’ ही वाद्यवादन जुगलबंदी मैफल या रंगसंमेलनात साकार होणार आहे. रंगसंमेलनातला ‘संवादरंग’ सादर करताना, खण्डप्राय तसेच लक्षवेधी व्यक्तीची मुलाखत या सदरात, हिंदी-मराठी-गुजराथी या तिन्ही भाषातील नाटक-चित्रपट-मालिका या तिन्ही माध्यमातून समर्थ अभिनेता म्हणून यशस्वी कारकीर्द साकारलेल्या मनोज जोशी यांची गप्पागोष्टीमय मुलाखत घेतली जाणार आहे. ‘चाणक्य’ या हिंदी नाटकाच्या भव्यदिव्य निर्मितीचे शिवधनुष्य पेलून त्याचे देशभरात एक हजारपेक्षा अधिक प्रयोग करणाऱ्या मनोज जोशींना बोलतं करतील, महाराष्ट्रातील लोकप्रिय-लोकमान्य मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ ! ‘भावगीत रंग’ रंगवताना होणाऱ्या सुगम संगीत मैफलीत, गेल्या ९३ वर्षांच्या मराठी भावगीत वाटचालीचा मागोवा घेणारा ‘स्वरभावयात्रा’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. गायक विनायक जोशींची संकल्पना असणाऱ्या ‘स्वरभावयात्रे’त रवींद्र साठे, अनुराधा मराठे, डॉ. मृदुला दाढे-जोशी, नीलाक्षी पेंढारकर, मानसी जोशी, विनायक जोशी या नामवंत आणि प्रस्थापित गायक-गायिकांना ऐकायला मिळण्याची संधी श्रोत्यांना लाभणार आहे. या श्रवणीय मैफलीच्या वाद्यसाथीसाठी महेश खानोलकर, संदीप मयेकर, गिरीश प्रभू, डॉ. हिंमाशु गिंडये, डॉ. प्रमोद धोरे यांसारख्या प्रथितयश वादकांच्या साथसंगतीची जोड लाभणार आहे.
जन्मशताब्दी सुरु असलेले कविवर्य गदिमा आणि संगीतकार सुधीर फडके यांनी अजरामर करुन ठेवलेले ‘गीतरामायण’, आपण आजवर फक्त कानांनी ऐकत आलो आहोत. चतुरंगच्या या रंगसंमेलनात ‘डोळ्यांनी बघायचे गीतरामायण’ हा अनोखा ‘नृत्यरंग’ असणार आहे. त्यामधे सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यगुरु सौ. सोनिया परचुरे या स्व. बाबूजींच्याच आवाजातल्या रामायणगीतांवर ‘नृत्यस्वरुप गीतरामायण’ सादर करतील. प्रख्यात नृत्यकलाकार नकुल घाणेकर यांच्यासह आणखी सुमारे ४० नृत्यकलावंत यात सहभागी असतील. डोळे-कान-मन तृप्त करणारा हा नयनमनोहर ‘नृत्यरंग’ नाशिकरांसाठी चतुरंगचा एक खास नजराणा असेल !
ब्याऐशी वर्षीय सामाजिक कार्यकर्ते श्रीमान्‌ सय्यदभाई यांना यावर्षी देण्यात येणाऱ्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने ‘कृतज्ञतारंग’ म्हणून होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात ॲडव्होकेट श्री. उज्ज्वल निकम यांच्यासोबत सर्वश्री विनायकदादा पाटील, डॉ. विनय सहस्रबुद्धे, विजय कुवळेकर, प्रकाश पाठक, भानू काळे, डॉ. सागर देशपांडे, सुधीर जोगळेकर ही मान्यवर मंडळी सहभागी असतील. सौ. मुग्धा गोडबोले या सोहोळ्याचे सूत्रसंचालन करतील. रंगसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद नाशिक-धुळे येथिल ख्यातकीर्त चार्टर्ड अकाऊटंट, सव्यासाची वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीमान्‌ प्रकाशजी पाठक भूषवणार असून, प्रमुख उद्‌घाटक या नात्याने श्री. विनायकदादा पाटील यांचेही भाषण ऐकायला मिळणार आहे. चतुरंगच्या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाशिकमधल्या या २९व्या रंगसंमेलनाचे उद्‌घाटन २९ नामवंत नाशिककरांच्या शुभहस्ते अभिनव पद्धतीने केले जाणार आहे.
श्रवणीय-दर्शनीय अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा इतका भरगच्च ऐवज असलेल्या रंगसंमेनलाच्या पूर्णोत्सव प्रवेशिका, जहागिरदार बेकर्स – कॅनडा कॉर्नर, बी.एस्‌.एन्‌.एल्‌. ऑफिसजवळ येथे आणि जहागिरदार बेकर्स-रेड क्रॉस सिग्नल, गांवकर भवन शेजारी, टिळकपथ, नाशिक येथे गुरुवार दि. ५ डिसेंबरपासून सकाळी १० ते रात्रौ ८ या वेळेत उपलब्ध होतील. अगदी पुढच्या कक्षातील आसनांसाठी ‘स्वागतयात्री योजने’च्या देणगी प्रवेशिकांची नोंदणी सुरु झालेली असून त्यासाठी इच्छुकांनी सौ. मेघना काळे (९३२४५२२३८०), विद्याधर निमकर (९८१९७८८०४०) यांना संपर्क करावा, असे चतुरंगने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.