सवाई एकांकिकोत्सव – मंत्रमुग्ध करणारा नाट्याविष्कार

सवाई म्हणजेच सर्वोत्तम अर्थात “best of the best”. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात आयोजित झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे केवळ विजेत्या एकांकिकाच, सवाई एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पात्र ठरतात. ह्या वर्षी अशा २६ उत्कृष्ट एकांकिकांनी अंतिम फेरी गाठण्यासाठी आपले सादरीकरण केले आणि त्यातील ७ तगड्या एकांकिकांची अंतिम फेरी २५ जानेवारी ला सुरु होऊन २६ जानेवारी ला पहाटे संपूर्ण वंदे मातरम् ने संपन्न झाली. गेली तब्बल ३२ वर्षे ह्याच दिवशी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे ही स्पर्धा चतुरंग प्रतिष्ठान आयोजित करत आहे. सवाई एकांकिका स्पर्धेतील निवडक आणि ‘Best of the Year’ आणि ‘Best of the State’ एकांकिकांचा आनंद पुण्यातील नाट्यप्रेमींना घेता यावा म्हणून ‘सवाई एकांकिकोत्सव’ पुण्यात २०१७ पासून आयोजित करण्यात येतो. यंदा एकांकिकोत्सवाच्या तिसऱ्या वर्षी तुरटी, एकादशावतार, मँट्रीक आणि I Agree ह्या ४ एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. समाजातील विविध मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या ह्या एकांकिकांचे विषय देखील अतिशय वेगळे पण वास्तववादी होते. एकांकिका/नाटकांचं मनोरंजनासोबतच समाज प्रबोधन आणि वैचारिक जडणघडणीचं सूत्र ह्या एकांकिकांनी समर्थपणे पाळलं/जपलं.
सुमारे 40 वर्षांपूर्वीच्या एका सत्यघटनेवर भारतातील पहिल्या महिला न्हावी श्रीमती शांताबाई श्रीपती यादव ह्यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ‘तुरटी’ ही महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबईची एकांकिका श्रीपती-शांताक्का ह्या न्हावी दांपत्याच्या आनंदी कौटुंबिक वातावरणात सुरु होते आणि घरातल्या कर्त्या श्रीपतीच्या जाण्याने कुटुंबावर पसरलेल्या शोककळा आणि हलाखीच्या परिस्थितीचं चित्रण मन हेलावून टाकते. अशा परिस्थितीत शांताक्का न्हावीकामाच्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात समाजाच्या प्रखर विरोधाला तोंड देत खंबीरपणे उभी राहून आपला प्रपंच चालवते.
दुसरी एकांकिका होती मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयाची ‘एकादशावतार’.  एका गावातील जत्रा  आणि त्या जत्रेतील नाटकाच्या निमित्ताने होणाऱ्या राजकारणावर भाष्य करणारी अशी ही एकांकिका. गावातील उदयोन्मुख पुढारी आणि प्रस्थापित सरपंच ह्यांच्या संदर्भाने समाजातील वृत्तीवर ही एकांकिका प्रकाश टाकते. जत्रेतील नाटकात ब्रम्हा (सृष्टीचा कर्ता) आणि महेश (सृष्टीचा शेवट) सोबत अपेक्षित असलेल्या विष्णु (सृष्टीचा समतोल साधणारा) च्या अनुपस्थितीचे सध्याच्या काळातील समाजाच्या ढळलेल्या समतोलाशी  असलेले साम्य ही एकांकिका सुंदर पद्धतीने दाखवते. 
ह्यानंतर नाट्यवाडा, औरंगाबाद ने ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलीची शिक्षणाची तीव्र इच्छाशक्ती आणि त्यासाठी तिचे आणि कुटुंबाचे कष्ट ‘मॅट्रिक’ ह्या नितांत सुंदर एकांकिकेतून उलगडून दाखवले. सदर एकांकिकेत शिक्षणादरम्यान आलेल्या संकटांवर जिद्दीने केलेली मात प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेली आणि सादरीकरणाने दाद मिळवली.
एकांकिकोत्सवाचा शेवट सध्याचा ज्वलंत आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या इंटरनेट चा वापर आणि त्यातील धोके ह्यासंदर्भातील एकांकिकेने झाला. इंटरनेटवरील विविध गोष्टींना पूर्ण न वाचता/बघता संमती दिल्याने होणाऱ्या गंभीर घोटाळ्यांवर भाष्य करत प्रेक्षकांना जागृत करणारी ‘I Agree’ एकांकिका पुण्याच्या ‘आमचे आम्ही’ संस्थेने सादर करत सर्वांना विचार करण्यास भाग पाडले.
यंदाच्या एकांकिकोत्सवाला देखील अनेक मान्यवर चतुरंग प्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावली. जेष्ठ मूर्तीतज्ज्ञ तसेच इतिहासाचे अभ्यासक श्री. देगलूरकर सर, व्यवसायाने दंत-वैद्य पण आवड म्हणून पूर्णवेळ शिल्पकला करणारे डॉ. राईलकर सर, बँक ऑफ महाराष्ट्र चे श्री.क्षीरसागर सर, प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. प्रमोद चौधरी सर या आणि अशा अनेक चतुरंग प्रेमींनी एकांकिकोत्सवाला मनापासून दाद दिली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?February 8, 2019
5.30 AM
ठिकाणभरत नाट्य मंदिर, पुणे
पत्ताभरत नाट्य मंदिर, पुणे
प्रमुख पाहुणेगो. बं. देगलूरकर.

फोटो गॅलरी