चतुरंग रत्नागिरी द्वितीय वर्धापनदिन

आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही गोष्टीच्या प्रारंभास एक अनन्य साधारण महत्त्व आहे. मग तो कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ असो.. अगदी नव्या आयुष्याचा, नव्या संसाराचा किंवा नव्या घराचाही. त्या घटनेशी संबंधित असलेला प्रत्येक व्यक्ती हा प्रारंभीचा क्षण कधीच विसरत नाही. तो दिवसही आपण सर्वजण लक्षात ठेवतो आणि त्या गोष्टीचा वाढदिवस साजरा करतो. त्या क्षणांना , त्या आठवणींना त्यादिवशी ताजं करतो. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 18 फेब्रवारी 2017 रोजी अशाच एका गोष्टीचा प्रारंभ झाला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एका खोलीत get together च्या निमित्ताने जमलेल्या या चतुरंगींनी संस्थेच्या नव्या केंद्राच्या सुरुवातीचा विडा उचलला आणि चतुरंग प्रतिष्ठानचे रत्नागिरीतील केंद्र सुरू करण्यात आले. आज बघता बघता या घटनेला दोन वर्ष झाली. त्या क्षणी उपस्थितीत असलेल्या प्रत्येक चतुरंगी मनात तो क्षण कायम टिकून राहिला होता. गेल्या दोन वर्षात चतुरंग रत्नागिरी मार्फत “मुक्तसंध्या”, “एक कलाकार एक संध्याकाळ”, “स्वातंत्र्याचे पूर्वरंग” यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित करून ते यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. वर्धापनदिनाच्या निमित्ताने मागच्या दोन वर्षातील आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्याच बरोबर पुढील ध्येय ठरवण्यासाठी 19 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात रत्नागिरीतील चतुरंगी जमले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अथर्वशीर्ष म्हणून कार्यक्रमाचा “श्रीगणेशा” करण्यात आला. चतुरंग प्रथेप्रमाणे पियूष प्राशन करून रत्नागिरीकरांनी संस्थेचा हा पायंडा सुरू ठेवला. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनाना श्रध्दांजली वाहण्यात आली. लता दीदींच्या ” ये मेरे वतन के लोगो” या गाण्याने सर्वजण करुणेने भारावून गेले. सर्व चतुरंगींनी आपापले नाश्त्याचे डबे एकत्र केले होते. त्या डब्यांना क्रमांक देऊन त्या नंबरच्या चिठ्ठ्या प्रत्येकाला देण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येकाने तो खाऊ सगळ्यांना वाटून एकत्रित रित्या खेळीमेळीच्या वातावरणात नाश्त्याचा आनंद घेण्यात आला. यामुळे सर्वांमधील एकोपा वाढलाच परंतु अशा अनोख्या पद्धतीने केलेल्या या खानपानाची आठवण सर्वांच्या स्मृतीपटलावर नक्कीच टिकून राहिली असेल. त्यानंतर कार्यक्रमाच्या विभागांना सुरुवात झाली. या संस्थेतील बहुतांश कार्यकर्ते चतुरंगच्या निवासी वर्गाचे विद्यार्थी होते. चतुरंग निवासी वर्गातील शिस्त, तेथील संस्कार प्रत्येकाच्या मनावर बिंबवले गेले होते. रेवती गद्रे हीने निवासी वर्गातील आठवणीमध्ये सर्वांना नॉस्टॅल्जिक केले. यश कापडी आणि ओंकार केतकर यांनी वर्गातील अभ्यासाव्यतिरिक्त लावण्यात आलेल्या सवयीचं रोजच्या जीवनातील महत्त्व सर्वांना पटवून दिलं. “पहाटेच्या प्रातःस्मरण, त्याचं बरोबर सूर्यनमस्कार, योगासन ,रात्रीच्या गप्पा मारताना सांगितलेली डायरी लिहिण्याची सवय इत्यादी गोष्टींचं पालन हे नियमित रित्या करायला हवं” हा या दोघांच्या बोलण्याचा मतितार्थ होता.
या कार्यक्रमासाठी चतुरंगच्या इतर केंद्रावरील काही मंडळी उपस्थित होती. चतुरंगच्या डोंबिवली – पुणे केंद्रावरील कार्यकर्त्या सौ. इंद्रायणी दीक्षित यांचा निवासीवर्गाच्या पहिल्या वर्षापासून या वर्गात सहभाग होता. कार्यकर्ता म्हणून अनुभवलेली तेव्हाची परिस्थिती व आताची परिस्थिती आणि त्यातील स्थित्यंतरं या विषयावर इंद्रायणी ताईंनी सर्वांची गप्पा-गोष्टी केल्या. 1997 साली वहाळ गावी जाण्यासाठी चिपळूणहून फक्त एकच बस होती. वर्गासाठी लागणारं समान हे मुंबईतून आणावं लागत असे. आता उपभोगास येणाऱ्या कोणत्याही भौतिक सोई सुविधांचा तेव्हा मागमूसही नव्हता. कच्चे रस्ते, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, मोजक मनुष्यबळ इत्यादी गैरसोयी असतानाही तेव्हाचा निवासीवर्ग व्यवस्थित रित्या सुरू असायचा. 1997 च्या वर्गाचा साचा आजची त्याचं पद्धतीचा असलेला दिसतो. काही सुधारणांमुळे आता त्याचे स्वरूप थोड्या अधिक प्रमाणात बदलेलं दिसतं. निवासी वर्गाच्या या जडणघडणीस सर्वात जास्त कुणाचा हातभार लागला असेल तर तो स्व. एस. वाय. गोडबोले सरांचा. इंद्रायणी ताईंनी गोडबोले सरांचा उल्लेख आवर्जून केला. त्याच बरोबर चतुरंग बाह्य मंडळीं चा ही यास तितकच योगदान लाभलं. गेल्या 22 वर्षात निवासी वर्गातील काही अडचणी ही मांडल्या. त्याचं बरोबर तेव्हाच्या विद्यार्थ्यांची मानसिकता आणि आताच्या विद्यार्थ्यांची मानसिकता यात झालेले बदल इंद्रायणी ताईंनी दर्शवले.
यानंतरच्या विभागात चतुरंग मध्ये नव्याने रुजू झालेल्या पण निवासी वर्गात नसलेल्या काही कार्यकर्त्यांनी “चतुरंग मध्ये रुजू होऊन मी काय शिकले?” या विषयावर आपापली मते मांडली. सई विद्वांस हिची प्रत्येक गोष्टीत भीती बाळगण्याची व नकारार्थी विचार करण्याची सवय चतुरंग मध्ये रूजू झाल्यावर कशी दूर झाली या विषयी सांगितले. ” मला बोलण्याची सवय नाही” असं म्हणणाऱ्या प्रथमेश नवरे याने चतुरंग मधील त्याच्या प्रवासाबद्दल अगदी ओघळत्या शब्दात त्याचे विचार मांडले. ” चतुरंग मधील शिस्त माझ्या अंगी लागली ” असं म्हणून मयुरी केतकर हिचे मत होते. अदिती जोशी व सुयोग रानडे यांनी देखील आपली मते मांडली. त्यानंतर चतुरंग कार्यकर्त्या सौ. मेघना काळे यांनी रत्नागिरी चतुरंगींशी गप्पा मारल्या. चतुरंग मधील त्यांचा प्रवास. संस्थेशी झालेली ओळख त्याच बरोबर संस्थेच्या सुरुवातीच्या काळातील काही प्रसंग मेघना काकूंनी सर्वांसमोर मांडले. कार्यकर्त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरही दिली. मोठ्या कार्यक्रमात होणाऱ्या काम वाटपा पासून ते संस्थेच्या चालणाऱ्या आर्थिक कामांबद्दल काकूंनी सर्वांना अनुभव सांगितले. चतुरंग प्रतिष्ठानच पहिलं रंगसंमेलन 1991 साली पार पडलं. माधवाश्रम वास्तूतील काही आठवणी, तेव्हाच्या कामातील काही अडचणी या सर्वांबाबत काकूंनी मोकळेपणाने सर्वांशी चर्चा केली. त्याच बरोबर थोरामोठ्यांचे संस्थेला लाभलेले आशीर्वाद , काही जाणकारांचे सल्ले आताच्या घडीला कसे उपयोगी पडले? याबाबत काकूंनी मत मांडले. याचबरोबर कार्यकर्ता म्हणून वावरताना हवा असलेला दृष्टिकोन, कोणतेही काम करताना समर्पणाची वृत्ती , स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा तोल सांभाळून काम करण्याची कसब, गरजेचे असलेले अवांतर वाचन इत्यादी गोष्टीविषयी काकूंनी मार्गदर्शन केले.
यानंतर कार्यकर्त्यांनी आपले कलाविष्कार सादर केले. गाणी व कविता सादर करून कार्यकर्त्यांनी सर्वांचे मनोरांगन केले. यानंतर इंद्रायणी ताईसोबत सुर मिसळून सर्व चतुरंगींनी ” आम्ही सारे चतुरंगी” हे गीत गुणगुणत कार्यक्रमाची सांगता झाली. वर्धापन दिनाच्या दिवशी भूतकाळाचा आढावा घेत भविष्यातील करावयाच्या वाटचालीची जाणिव प्रत्येकाच्या मनात कोरली गेली. या दिवसाच्या कार्यक्रमाची आठवण प्रत्येक चतुरंगीच्या मनात कायम टिकून राहील हे नक्की!

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?February 24, 2019
8.00 AM
ठिकाणगोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
पत्तागोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी

फोटो गॅलरी